जलजागृती सप्ताह उरला नावापुरता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 12:13 IST2021-03-18T12:13:25+5:302021-03-18T12:13:46+5:30
Washim News प्रचारकार्यासाठी निधीच मिळत नसल्याने विशेष असे कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले.

जलजागृती सप्ताह उरला नावापुरता!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येतो; मात्र वाशिम जिल्ह्यात गतवर्षीपासून हा सप्ताह केवळ नावापुरताच साजरा होत असून, जनजागृतीपर कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे दिसत आहे. शासन स्तरावरून प्रचारकार्यासाठी निधीच मिळत नसल्याने विशेष असे कुठलेही उपक्रम राबविले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी सांगितले.
दरवर्षी उद्भवणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता, पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या आणि जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधीचे कायदे आणि नियमांचे पालन करण्याबाबत समाजात जागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने २२ मार्च रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक जलदिनानिमित्त दिनांक १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाने ९ मार्च २०१६ रोजी पारित केलेल्या शासन निर्णयाव्दारे दिले होते. या सप्ताहादरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत जलजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
प्रत्यक्षात मात्र शासन निर्णय पारित झाला, तेव्हापासून केवळ एक वर्ष तत्कालिन कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जलजागृती सप्ताह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शासनाने बाळगलेल्या मूळ उद्देशालाच तडा जात असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यातच कोरोना विषाणू संसर्गाची सुरूवात झाली होती. त्यामुळे जलजागृती सप्ताहांतर्गत कुठलेही उपक्रम राबविण्यात आले नाहीत. यावर्षीही तशीच परिस्थिती असून, गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम घेण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. शिवाय निधीची तरतूद नसल्याने प्रचारकार्य अशक्य ठरत आहे.
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता,
जलसंपदा, वाशिम