Washim milk chilling center closed again! | वाशिमचे दूध शितकरण केंद्र पुन्हा पडले बंद!
वाशिमचे दूध शितकरण केंद्र पुन्हा पडले बंद!


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे जिल्ह्यातील शासकीय दूध संकलन केंद्रांना उतरती कळा प्राप्त झाली असून दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून दूध स्विकारण्यावर विविध स्वरूपातील मर्यादा लादण्यात आल्या आहेत. दुसरीकडे खुल्या बाजारातही म्हशीच्या दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिमचे दूध शितकरण केंद्र पुन्हा बंद पडले असून गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे कामही बंद आहे. १५० पैकी केवळ २ ते ३ तालुका दूध उत्पादक सहकारी संस्था सद्या कशाबशा तग धरून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रम मिळवून आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता काही वर्षांपूर्वी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसायाचा समावेश होता. शेतीला शाश्वत जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला; मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले दूध खरेदी करण्याच्या प्रक्रियेत शासनाकडूनच नानाविध अटी घालण्यात आल्या. त्यामुळे दुग्धोत्पादकांसोबतच दूध उत्पादक सहकारी संस्थाही त्रस्त झाल्या.
अशातच वाशिममधील दूध शितकरण केंद्राने दूध उत्पादक सहकारी संस्थांकडून २०० लीटरपर्यंत दूध स्विकारण्याची मर्यादा लादून दिली आणि या मर्यादेत दूध येत नसल्याचे कारण समोर करून ८ ते १० दिवसांपासून दूध शितकरण केंद्र बंद करण्यात आले.


शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तत्कालिन शासनाने गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकºयांना भरीव अनुदान दिले. एवढेच नव्हे; तर कॅन खरेदीसाठी अनुदान, गुरांचे वेळोवेळी लसीकरण करण्यावर भर दिला. विद्यमान शासनाने मात्र दुग्धोत्पादन वाढण्यासाठी पुरक असलेल्या या सर्व बाबींवर टाच आणली आहे. त्यामुळेच दूध उत्पादक संघासह सहकारी संस्थांनीही आपले काम बंद केले आहे.
- वामनराव देशमुख
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, वाशिम

वाशिमच्या दूध शितकरण केंद्राने आधी २०० लीटरपर्यंत दूध स्विकारण्याची मर्यादा लादली आणि ८ ते १० दिवसांपासून केंद्रच बंद पाडले. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. तेव्हा दुग्धोत्पादक शेतकºयांनी आंदोलने करून केंद्र सुरू करून घेतले. या प्रश्नावर लवकरच मोठे आंदोलन उभारण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत.
- विशाल सोमटकर
दुग्धोत्पादक शेतकरी, वाशिम


Web Title: Washim milk chilling center closed again!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.