वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!
By Admin | Updated: November 16, 2014 01:52 IST2014-11-16T01:42:26+5:302014-11-16T01:52:57+5:30
खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर :शेतक-यांना किंचीत दिलासा.

वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!
वाशिम : यंदाच्या खरीप हंमागात सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना जिल्हा प्रशासनाने काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामाकरिता प्रशासनाने जाहीर केलेली सुधारित पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदा सोयाबीनच्या पिकांवर मोठय़ा प्रमाणात रोगराईचा प्रकोप झाला होता. परिणामी, उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष उत्पादन यामधील तफावत वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. शासकीय मदत जाहीर करण्यासाठी अथवा जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैश्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १३१ गावांची पैसेवारी ४४ पैसे इतकी आहे, तर मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. रिसोड तालुक्यातील १00 गावांची पैसेवारी ४६ पैसे असून, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ४६ पैसे इतकी आहे. कारंजा तालुक्यातील १६७ गावांची आकडेवारी ३७ पैसे तर मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.