वाशिम जिल्ह्यातील तलाठी कार्यालये वार्यावर
By Admin | Updated: July 3, 2014 02:10 IST2014-07-03T02:09:41+5:302014-07-03T02:10:03+5:30
धक्कादायक वास्तव : नागरिकांना नाहक हेलपाटे, प्रवास भाड्याचा भुर्दंड

वाशिम जिल्ह्यातील तलाठी कार्यालये वार्यावर
वाशिम : सध्या पेरण्या व शाळा, महाविद्यालय प्रवेशाचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पालक व विविध योजनांच्या लाभार्थ्यांना फेरफार, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींची तातडीची गरज आहे; परंतु कार्यालयीन वेळेत उघडी मिळतील ती तलाठी कार्यालये कसली, असा अनुभव जिल्हय़ातील बहुतांश तलाठी कार्यालयात कामानिमित्त जाणार्या ग्रामीण भागातील नागरिकांना येती. बुधवार २ जुलै रोजी जिल्हय़ातील २८0 तलाठी सज्जापैकी मंगरुळपीर,कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम व मानोरा तालुक्यातील काही सज्जाला टीम लोकमतने एकाचवेळी भेट दिली असता त्यात धक्कादायक वास्तव दिसून आले.
बहुतांश तलाठी सज्जे चक्क कुलूपबंद आढळून आले. त्या परिसरात आपले काम होईल, या आशेने आलेले शेतकरी, नागरिक, विद्यार्थी येऊन कार्यालय बंद असल्याचे पाहून परत जात असल्याचे दिसून आले. काही तलाठी कार्यालये उघडी असली तरी काही कार्यालयात तलाठी जागेवर नसून काही खासगी रायटर तेथे येणार्या नागरिकांना तलाठय़ाने आधीच सहय़ा करुन ठेवलेले दाखले लिहून देताना दिसले.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शासकीय दस्ताऐवजच नव्हे तर संपूर्ण शासकीय कार्यालयच त्यांच्या ताब्यात असल्याचे आढळून आले.मालेगाव येथे तलाठी कार्यालय बंद असल्याचे आढळले. मंगरुळपीर शहरात व शेलूबाजार, पार्डीताड, कवठळ, आसेगाव येथे तलाठी कार्यालये कुलूपबंद होती. तालुक्यातील अनेक कार्यालयात दोन तीन तलाठी मिळून एक कार्यालय चालवित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे दलाल दाखला देण्याची कामे करीत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. कारंजा शहरातील तहसील कार्यालय सुरु असले तरी उंबर्डा बाजार व अन्य गावात कार्यालये बंद असल्याचे आढळून आले.
मानोरा शहरात तलाठी कार्यालय सुरु असून, तेथे मोठय़ा संख्येने नागरिक कामासाठी जमलेले दिसून आले. ग्रामीण भागातील चार पाच तलाठी मिळून जागा भाड्याने घेऊन कार्यालय चालवत असल्याचे; तसेच शहरात राहून घरुन कारभार चालवित असल्याचे लोकांकडून कळले. विशेष म्हणजे तलाठय़ाला कार्यालयासाठी भाड्याची विशिष्ट रक्कम मिळत असली तरी चार पाच जण मिळून कार्यालय का चालवतात, हे कोडेच बनले आहे. रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी तलाठय़ांची कार्यालयेच नसून तलाठय़ांच्या शहरातील घरातूनच कारभार चालत असल्याचे आढळले. त्यासाठी ग्रामस्थांना २0-२५ किमीचा प्रवास करुन तलाठय़ाची भेट न झाल्यास एसटी भाड्याचा दुहेरी भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. वाशिम हे जिल्हय़ाचे मुख्यालय असल्याने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी वाशिमलाच असल्याने येथील तलाठी कार्यालयात सर्व तलाठी काम करीत असल्याचे आढळून आले. सध्या संगणकावर शासकीय डाटा फिडींगचे काम सकाळी १0.३0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असल्यामुळे दररोज सकाळी १0.३0 ते दुपारी २.३0 दरम्यान तेथे नागरिकांची कामे केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.