उंबर्डा बाजार-येवता मार्गावर वृक्ष लागवडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:09+5:302021-07-21T04:27:09+5:30
सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्रअंतर्गत उंबर्डा बाजार ते येवता बंदी मार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी महिनाभरापूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र, ...

उंबर्डा बाजार-येवता मार्गावर वृक्ष लागवडीची प्रतीक्षा
सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्रअंतर्गत उंबर्डा बाजार ते येवता बंदी मार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी महिनाभरापूर्वी खड्डे खोदण्यात आले. मात्र, अद्यापही या खड्ड्यांत वृक्ष लागवड झाली नसून, हे खड्डे आता बुजण्याच्या स्थितीत आल्याने वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र कारंजाअंतर्गत उंबर्डा बाजार ते येवता बंदी या रस्त्याच्या दुतर्फा जवळपास एक हजार वृक्ष लागवडीसाठी महिनाभरापूर्वी खड्डे खोदण्यात आले. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदताना खड्ड्याची खोली तथा लांबी-रुंदीचे भानही ठेवण्यात आले नसून, वृक्ष लागवडीचे खड्डे थातूरमातूर पद्धतीने खोदण्यात आल्याचे दिसत आहे.
त्यातही हे खड्डे खोदल्यानंतर पावसाळी वातावरणाचा अंदाज घेत तातडीने या खड्ड्यांत वृक्षांची लागवड करणे अपेक्षित होते; परंतु त्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे गतआठवड्यात आलेल्या सततच्या पावसाने वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात अनेक खड्डे खचून त्यात पुन्हा गाळ साचल्यामुळे ते खड्डे बुजण्याच्या स्थितीत आहेत. ही बाब लक्षात घेत तरी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उंबर्डा बाजार-येवता बंदी मार्गांवर वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्याची प्रत्यक्ष पाहणी करूनच वृक्ष लागवडीची परवानगी द्यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.
---------
खड्डे खोदण्यासाठी केलेला खर्च व्यर्थ
उंबर्डा बाजार-येवता मार्गावर सामाजिक वनीकरणकडून दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन करून महिनाभरापूर्वी १ हजार खड्डे खोदण्यात आले. यासाठी कामगार लावून त्यांना मजुरी द्यावी लागली. या खड्ड्यांसाठी हजारो रुपये सामाजिक वनीकरण विभागाने खर्च केले; परंतु आता महिना उलटला तरी या खड्ड्यांत वृक्ष लागवड झाली नसल्याने खड्डे खोदण्यासाठी केलेला खर्च व्यर्थ ठरत आहे.