कृषी साहित्य खरेदीची प्रतीक्षा संपली!
By Admin | Updated: April 27, 2015 01:35 IST2015-04-27T01:35:12+5:302015-04-27T01:35:12+5:30
विशेष घटक योजना; कृषीपयोगी साहित्यासाठी अनुदान.

कृषी साहित्य खरेदीची प्रतीक्षा संपली!
वाशिम : विशेष घटक योजनेंतर्गत कृषीपयोगी साहित्याचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हय़ातील सहा पंचायत समितीला एक कोटी ४७ लाख २२ हजार ५00 रुपयांचे अनुदान वितरण केल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी २६ एप्रिल रोजी दिली. यापूर्वी पंचायत समितींना तीन कोटी ५९ लाख २३ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतकरी लाभार्थ्यांंचे जीवनमान उंचाविण्यासाठी व त्यांना दारिद्रय़रेषेवर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने विशेष घटक योजनेंतर्गत विहीर, मोटरपंप, बैलगाडी व बैलजोडी, ताडपत्री, पीव्हीसी पाईप यासह विविध प्रकारच्या कृषीविषयक साहित्याचे १00 टक्के अनुदानावर वितरण करण्यात येते. २0१४-१५ या आर्थिक वर्षात जवळपास दीड हजार लाभार्थ्यांंची निवड विशेष घटक योजनेंतर्गत करण्यात आली होती. कृषीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी यापूर्वी जिल्हय़ातील सहा पंचायत समितींना कृषी विभागाच्यावतीने तीन कोटी ५९ लाख २३ हजार रुपयांचे अनुदान वितरित केले होते. उर्वरित लाभार्थ्यांंना निधीअभावी कृषी साहित्य खरेदी करण्यात व्यत्यय निर्माण झाला होता. मंजूर निधी मिळण्यासाठी सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. एप्रिल महिन्यात उर्वरित एक कोटी ४७ लाख २२ हजार ५00 रुपयांचा निधी प्राप्त झाला. लाभार्थ्यांंना कृषीपयोगी योजनांचा लाभ घेता यावा म्हणून आवश्यक तेवढा निधी पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात आला आहे.