शेतकर्यांना कृषीपंपाच्या वीजजोडणीची प्रतीक्षाच
By Admin | Updated: July 13, 2014 22:41 IST2014-07-13T22:41:16+5:302014-07-13T22:41:16+5:30
दीर्घ प्रतीक्षेनंतरही वीजजोडणी नाही : आणखी किती महिने वाट बघावी?

शेतकर्यांना कृषीपंपाच्या वीजजोडणीची प्रतीक्षाच
मालेगाव : शेतकर्यांचे हिरवे स्वप्न साकारण्याकरिता मोफत वीजजोडणी देण्यासाठी निघालेल्या तालुका कृषी विभागाला वीज वितरण कंपनीकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. १२५ कृषीपंपाच्या वीजजोडणीच्या शुल्कापोटी दीड वर्षांंपूर्वी आठ लाख ३१ हजार २५0 रुपये वीज वितरण कंपनीच्या खात्यात कृषी विभागाने जमा केल्यानंतरही ३0 टक्के शेतकर्यांच्या विहिरीजवळ अद्यापही विद्युत मीटर बसू शकले नाही.
दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विविध योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींवर वीजपंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात सुरूवातीला २६५ लाभार्थींंचे उद्दिष्ट मिळाले होते. लाभार्थींंची संख्या लक्षात घेता सदर उद्दिष्ट तोकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी विभागाकडे पाठपुरावा करून १३२५ कृषीपंप व वीजजोडणी खेचून आणली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील १२५ लाभार्थींंचा समावेश आहे.
वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपये शुल्क आहे. १२५ लाभार्थींंचे एकूण आठ लाख ३१ हजार २५0 रुपये शुल्क कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालकांनी २0१२ च्या मे महिन्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे. त्यामुळे वीजजोडणी मिळण्यातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २0१२ च्या मे महिन्यात चार तालुक्यातील पात्र लाभार्थींंची यादी वीज वितरण कंपनीकडे पाठविली आहे. त्यानंतर उर्वरीत दोन तालुक्यातील लाभार्थींंची यादी पाठविली. पात्र लाभार्थींंची यादी आणि शुल्काचा भरणा या दोन्ही बाबींची पुर्तता झालेली असल्याने वीजजोडणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र, अजूनही जवळपास ३0 टक्के लाभार्थी शेतकर्यांना वीजजोडणी मिळाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
थकित बिलापोटी कृषी पंपाच्या वीजजोडण्या कापण्याचा धडक कार्यक्रम राबविणार्या वीज वितरण कंपनीने शुल्क भरल्यानंतर दीड वर्षातही वीजजोडणी न देता आपला शेतकरी विरोधी बाणा सोडला नसल्याची जाणीव करून दिली आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्या किरकोळ प्रश्नावरून रान उठविणारी मंडळीदेखील कृषीपंप जोडणीबाबत चुप्पी साधून असल्याने साशंकता व्यक्त केली जात आहे.