काजळेश्वर-खेर्डा मार्गाला डांबरीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:37+5:302021-02-13T04:39:37+5:30
काजळेश्वर-खेर्डा बु. या ८ किलोमीटर अंतराच्या मार्गावर काजळेश्वर आणि खेर्डासह कारंजा तालुक्यातील विविध वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. महामार्गाला ...

काजळेश्वर-खेर्डा मार्गाला डांबरीकरणाची प्रतीक्षा
काजळेश्वर-खेर्डा बु. या ८ किलोमीटर अंतराच्या मार्गावर काजळेश्वर आणि खेर्डासह कारंजा तालुक्यातील विविध वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. महामार्गाला जोडलेला मार्ग असल्याने यावर सतत वर्दळ असते. गेल्या दोन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आणि खडीही उघडी झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना मार्ग काढणे कठीण होत आहे, तर चारचाकी वाहनचालकांना खड्डे चुकवून मार्ग काढण्याची कसरत करावी लागत आहे. यातून अनेक दुचाकी या मार्गावर घसरल्याने अपघात घडून दुचाकीचालकांना दुखापती झाल्या आहेत. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि चालक वैतागून गेले आहेत. काजळेश्वर येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन उपाध्ये यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून मार्गाच्या अवस्थेबाबत माहिती देत दुरुस्तीची मागणी केली. त्याची दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्याची प्रतीक्षा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनानेच याची दखल घेऊन या मार्गाचे डांबरीकरण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.