इटलीच्या परिषदेत हेडा मांडणार विदर्भाची स्थिती
By Admin | Updated: January 23, 2015 01:56 IST2015-01-23T01:56:50+5:302015-01-23T01:56:50+5:30
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर व-हाडातील समस्या व उपाय योजनांचा उहापोह होणार.

इटलीच्या परिषदेत हेडा मांडणार विदर्भाची स्थिती
कारंजा (जि. वाशिम ): २६ ते २८ जानेवारी रोजी रोम (इटली) येथील संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी विभागाच्या मुख्य कार्यालयात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कारंजा येथील संवर्धनचे डॉ.नीलेश हेडा यांना मांडणी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले आहे.
अमेरिकेतील मिचिगन स्टेट युनिवर्सिटी आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत डॉ.हेडा हे विदर्भातील पाणवठय़ांचे, मास्यांचे, मासेमार, शेती व शेतकर्यांचे प्रश्न आणि या प्रश्नातून बाहेर पडण्याची कार्य योजना या विषयावर मांडणी करणार आहेत. या कार्यशाळेला जगभरातून सुमारे एक हजारावर शास्त्रज्ञ उपस्थित राहणार असून, खास करून नद्या, तलाव, मासे इत्यादी विषयावर आपआपले प्रबंध सादर करणार आहेत. डॉ.नीलेश हेडा हे कारंजा येथील संवर्धन संस्थेचे संस्थापक सभासद असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पहिल्याच ग्रिन्झा प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक सदस्य आहेत. लंडन येथील रूफोर्ड फाऊंडेशनचे ते गेल्या सात वर्षापासून फेलो असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि पर्यावरणाच्या विविध प्रश्नांवर कार्यरत आहेत. २३ जानेवारीला मुंबई येथून इटलीची राजधानी रोमकरिता रवाना होत असून, १२ दिवसांच्या त्यांच्या इटली भेटीत ते इटलीमधील विविध गावांनासुद्धा भेटी देऊन त्यांच्या शेती व्यवस्थेचा अभ्यास करणार आहेत. त्यांच्या रोम येथील मांडणीमुळे वर्हाडातले प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर मांडल्या जाणार आहेत.