मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी खोळंबली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:52+5:302021-02-05T09:25:52+5:30
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या सत्रात मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन आवेदनपत्र भरले आहेत. या आवेदनपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असून, काही ...

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी खोळंबली!
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या सत्रात मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन आवेदनपत्र भरले आहेत. या आवेदनपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असून, काही मुख्याध्यापकांनी यापूर्वीच आवेदनपत्रांची पडताळणी केली आहे. आता ही आवेदनपत्रे शाळास्तरावर पुन्हा पडताळणीसाठी परत पाठविण्यात आली आहेत. मुख्याध्यापक, नोडल अधिकाऱ्यांना लॉगिनवरून ही आवेदनपत्रे पाहून पुन्हा तपासणी करावी लागणार असून, या प्रक्रियेसाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. तत्पूर्वी, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारी रोजीच सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांना यासंदर्भात स्मरणपत्र पाठवून निर्धारित मुदतीत अर्ज पडताळणीचे काम पूर्ण करून घेण्यासह पडताळणीचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जिल्हास्तरावर अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.
----------
१०० पेक्षा अधिक अर्जांच्या शाळांची स्वतंत्र माहिती
मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी ज्या शाळांतून १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे किंवा अर्ज भरले आहेत. अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रांच्या प्रती, केवायसी फॉर्म गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.
-----------
विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापक जबाबदार
मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी करून पडताळणीचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सादर करणे मुख्याध्यापकांसाठी आवश्यक असून, या प्रक्रियेनंतर कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल, असा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रातून देण्यात आला आहे.