रिसोड : बसस्थानकापासून २०० मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित झालेला आहे. असे असताना नियमांची पायमल्ली होत असून, खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने २०० मीटर परिसरातच उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
रिसोड बसस्थानक परिसरात खासगी वाहनधारकांनी वाहने थेट बसस्थानकाच्या गेटवर लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने दररोज सकाळी बसस्थानकात जाऊन प्रवाशांची पळवापळवी करीत असल्याचा प्रकार घडत आहे. एसटी महामंडळ आधीच या ना त्या प्रकारे तोट्यात असून, खासगी वाहनांकडून अवलंबिण्यात आलेल्या चुकीच्या प्रकारामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.
...............
कोट :
खासगी वाहनधारकांनी त्यांची वाहने ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी न करण्यासंबंधी नियोजन करावे, याबाबत अनेक वेळा रिसोड पोलीस स्टेशन, तसेच वाशिम आरटीओ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप या प्रश्नावर प्रभावी तोडगा निघालेला नाही.
- श्रीकांत जगताप, आगार व्यवस्थापक, रिसोड