शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:28+5:302021-09-08T04:49:28+5:30
वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न प्रलंबित असून, याविरोधात भाजप शिक्षक आघाडी जिल्हा शाखा वाशिमने आवाज ...

शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
वाशिम : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न प्रलंबित असून, याविरोधात भाजप शिक्षक आघाडी जिल्हा शाखा वाशिमने आवाज उठविला असून, ८ सप्टेंबर रोजी जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करावे, एक तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम तत्काळ देय करावी, परिविक्षाधीन सहायक शिक्षक (शिक्षण सेवक) परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचारी (शिक्षकेतर सेवक) यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्यात यावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय १०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी, घोषित, अघोषित व मूल्यांकनास पात्र तुकड्या, शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही करावी, रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना १७ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार पूर्णकालीन कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळावे, वाशिम जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ वेतन पथक अधीक्षक देण्यात यावे आदी मागण्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
०००००
कोट
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात व शिक्षक शिक्षकेतरांच्या मागण्यासाठी शिक्षक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, न्यायोचित मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
- महेश उगले
जिल्हाध्यक्ष शिक्षक आघाडी, वाशिम