जिल्ह्यात ७५ आठवडे साजरे होणार विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST2021-08-21T04:47:17+5:302021-08-21T04:47:17+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक ...

जिल्ह्यात ७५ आठवडे साजरे होणार विविध उपक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रवार, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले, यावर्षी देशाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या अभिनव कार्यक्रमांतर्गत पुढील ७५ आठवडे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती, स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती, देशाची विविध क्षेत्रातील आतापर्यंतची वाटचाल याविषयीची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक शासकीय विभागाने ७५ आठवडे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
....................
जिल्ह्यातील घडामोडींवर राहणार विशेष भर
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान वाशिम जिल्ह्यात झालेल्या घडामोडींवर आधारित माहितीचे संकलन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यानुषंगाने शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन ऐतिहासिक दस्तऐवज व इतर साधनांचा अभ्यास करून माहिती तयार करावी. त्यावर आधारित स्वतंत्र ‘कॉफी टेबल बुक’ तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ऑनलाइन चर्चासत्र, व्याख्यान या माध्यमातूनही स्वातंत्र्य लढ्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
.....................
जिल्हास्तरीय कोअर समिती स्थापन
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय कोअर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असून जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव आहेत. सर्व शासकीय विभागांनी ७५ आठवडे विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासंबंधीची कार्यवाही करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले.