लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:26+5:302021-02-13T04:39:26+5:30
मूल जन्माला आल्यानंतर लगेच क्षयरोग प्रतिबंधक (बी.सी.जी.) लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचली जाते. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ ...

लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले!
मूल जन्माला आल्यानंतर लगेच क्षयरोग प्रतिबंधक (बी.सी.जी.) लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचली जाते. या लसीमुळे क्षयरोगापासून संरक्षण मिळते. बाळ दीड महिन्याचे झाल्यानंतर त्रिगुणी (ट्रिपल) लस टोचली जाते. या लसीमुळे घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यापासून संरक्षण मिळते. या लसीसोबतच बाळास पोलिओ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस द्यावा लागतो. गोवर हा लहान वयात होणारा धोकादायक आजार असून, त्यासाठी गोवर प्रतिबंधक लस मूल ९ ते १२ महिन्यांचे असताना टोचली जाते. ६ महिने ते ३ वर्षे या वयात ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव असतो. त्यामुळे या काळात ‘अ’ जीवनसत्वाचे डोस बाळाला पाजले जातात. त्याच्या दैनंदिन आहारात पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्याही असाव्या लागतात.
दरम्यान, वयाच्या ठरवून दिलेल्या टप्प्यांवर लसीकरण करणे आवश्यक असते; अन्यथा मूल निरनिराळ्या आजारांना बळी पडू शकण्याचा धोका असतो. असे असताना कोरोनाच्या संकटकाळात जन्मलेल्या व खासगी दवाखान्यांवर विसंबून राहणाऱ्या अनेक पालकांनी मुलांचे लसीकरण करून घेतलेले नाही. जिल्ह्यात हे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास आहे. शासकीय रुग्णालयांनी मात्र शंभर टक्के लसीकरण पूर्ण केल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
.....................
कधी, कोणती लस आवश्यक
जन्मानंतर २४ तासांत - बीसीजी, झीरो पोलिओ
दीड महिन्यानंतर - त्रिगुणी (ट्रिपल), पोलिओ पहिला डोस
त्यानंतर २८ दिवसांनी - त्रिगुणी (ट्रिपल), पोलिओ दुसरा डोस
त्यानंतर पुन्हा २८ दिवसांनी - त्रिगुणी (ट्रिपल), पोलिओ तिसरा डोस
नऊ महिन्यांनंतर - गोवर इंजेक्शन, ‘अ’ जीवनसत्व पहिला डोस
१६ ते २४ महिने - त्रिगुणी (ट्रिपल) बुस्टर, पोलिओ बुस्टर
...............
१५०००
लहान मुलांना
कोरोना काळात अत्यावश्यक असलेले कुठलेच डोस देता आले नाहीत.
................
२०१९ मध्ये लसीकरण पूर्ण
कोरोनाचे संकट ओढवण्यापूर्वी २०१९ या वर्षांत जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा लहान मुलांना सर्व प्रकारच्या लसी देण्यात आल्या होत्या. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी पैसे लागतात; तर शासकीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा मोफत असल्याने या रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक होते. २०२० मध्ये मात्र ते कमी झाल्याचे दिसून येत आहे.
...............
कोट :
मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहावी, यासाठी त्यांना जन्मापासून १६ वर्षे वयापर्यंत निरनिराळ्या प्रकारे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना काळात ज्या पालकांनी मुलांचे लसीकरण केले नाही, त्यांनी ते विनाविलंब करून घ्यावे.
- डॉ. राम बाजड, बालरोग तज्ज्ञ
............
कोट :
मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली नसल्यास त्यांना विविध स्वरूपातील आजार होऊ शकतात. त्यापासून संरक्षण होण्यासाठी ठरवून दिलेले लसीकरण अत्यावश्यक आहे. याकडे आई-वडिलांनी दुर्लक्ष करू नये.
- डॉ. हरीश बाहेती, बालरोग तज्ज्ञ.
...............
आता पुढे काय?
मूल जन्माला आल्यानंतर प्रत्येकास बी.सी.जी.ची लस टोचलीच जाते; मात्र त्यानंतर आवश्यक असलेले लसीकरण बहुतेकांनी केलेले नाही. त्याकरिता कोरोनामुळे उशीर झाला असला तरी लसीकरण करून घेणे शक्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.