अनुदानित खत वितरणासाठी ‘पॉस’चा वापर!

By Admin | Updated: April 15, 2017 00:49 IST2017-04-15T00:49:50+5:302017-04-15T00:49:50+5:30

कृषी विभागाची तयारी : वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामापासून होणार अंमलबजावणी!

Use of 'Poiss' for aided fertilizer distribution! | अनुदानित खत वितरणासाठी ‘पॉस’चा वापर!

अनुदानित खत वितरणासाठी ‘पॉस’चा वापर!

दादाराव गायकवाड - वाशिम
शेतकऱ्यांना अनुदानित खतांचे वितरण करण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामापासून अधिकृत आणि नोंदणी केलेल्या कृषीसेवा केंंद्रांवर ‘पॉस’ मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे अनुदानित खतांच्या वितरण प्रणालीत पारदर्शकता येणार आहे.
या पद्धतीत शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी झाल्यानंतरच मशीनमधील माहितीच्या आधारे खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अनुदानित खतांच्या कृत्रिम टंचाईवर नियंत्रण येऊन शेतकऱ्यांना फायदा होईलच शिवाय शासनाचे मोठ्या प्रमाणात अनुदानही वाचणार आहे. यापूर्वी प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यात ‘पॉस’ मशीनद्वारे अनुदानित खंताचे वितरण करण्यात आले. आता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.
त्यासाठी खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह ‘पॉस’ मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांकडून नोंदणीकृत कृषी केंद्रधारकांना या मशीनच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात १७ आणि १८ एप्रिल रोजी या प्रशिक्षण पहिल्या टप्प्यातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम घेण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील नोंदणीकृत कृषीसेवा केंद्रधारकांना या मशीन देण्यात येतील. वाशिम जिल्ह्यात अशी जवळपास ४०० कृषी सेवा केंद्र असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, या पद्धतीत एखाद्या शेतकऱ्याला इतर काही शेतकऱ्यांचे खतही उचलता येणार आहे; परंतु त्यासाठी सर्व संबंधित शेतकऱ्यांचे आधारक्रमांकाची सत्यप्रत सादर करावी लागणार आहे. आधारक्रमांक मशीनवर तपासून आणि शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा लावूनच खतांचे वितरण होऊ शकणार आहे.

केवळ आधारची पडताळणी
कृषी विभागाने यंदापासून डीबीटी पद्धतीनुसार ‘पॉस’ मशीनद्वारे अनुदानित खतांचे वितरण करण्याचे ठरविले असले तरी, या मशीनवर डेबिट, क्रे डिट कार्ड स्वाइप करण्याची सद्यस्थितीत सुविधा नाही. केवळ मशीनवर आधारकार्डची पडताळणी आणि अंगठ्याचा ठसा लावून खतांची विक्री होणार आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या खतांची किंमत शेतकऱ्यांना धनादेश किंवा रोखीने अदा करावी लागेल. तथापि, एखाद्या विके्रत्याकडे त्याची स्वत:ची म्हणजे शासनाच्या अधिकृत ‘पॉस’ मशीनशिवाय क्रेडिट कार्ड स्वाईप मशीन असेल, तर शेतकऱ्यांना कॅशलेस खरेदी करणेही शक्य होणार आहे.

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाची बचत व्हावी, तसेच शेतकऱ्यांना थेट अनुदानाचा फायदा व्हावा, या उद्देशाने यंदाच्या हंगामापासून ‘पॉस’ मशीनद्वारे अनुदानित खतांची विक्री करण्यात येणार आहे. येत्या १ जूनपासून या प्रक्रियेला जिल्हाभरात प्रारंभ होणार असून, यापूर्वी सर्व अधिकृत, नोंदणीकृत कृषी सेवा केंद्रधारकांना या मशीनच्या वापराबाबत मशीन निर्मात्या कंपनीसह खत निर्मिती करणाऱ्या कंपन्याच्या प्रतिनिधीसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- नरेंद्र बारापत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वाशिम

 

Web Title: Use of 'Poiss' for aided fertilizer distribution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.