कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका
By Admin | Updated: February 12, 2015 00:50 IST2015-02-12T00:50:40+5:302015-02-12T00:50:40+5:30
शेतकरी हवालदिल शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान.

कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका
कारंजा लाड (वाशिम) : वादळी वारा व अवकाळी पावसाचा कारंजा व मानोरा तालुक्यातील रब्बी पीक व फळबागांना मंगळवारच्या मध्यरात्री पुन्हा फटका बसला. या नैसर्गिक प्रकोपात अनेक गावातील विद्युत पोल, झाडे जमिनीवर कोसळली, तर घरावरील टिनपत्रे उडून गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
मंगळवारच्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान झाले. याशिवाय तालुक्यातील अनेक गावात रस्त्यावरील झाडे जन्मळून पडली. तसेच वीज वितरण कंपनीचे पोल वाकले, तर काहींच्या घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने प्रचंड धांदल उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, गायवळ, किनखेड येथे गारपीट झाली. ज्यामध्ये गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, पपई, आंब्याचा बहर आदींचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे येथील नीता रजेश हवा यांच्या शेतातील ऊस, गहू, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
२0१५ या वर्षाची सुरुवातही वादळी वारा व अवकाळी पावसाने झाली. १ जानेवारीला तालुक्यात अवकाळी पावसाने हैदोस घालून शेतकर्यांचे कंबरडे मोडले. आता फेब्रुवारी महिन्यातही हेच संकट शेतकर्यांवर दुसर्यांदा ओढवल्याने शेतकरी अतिशय हताश झाला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.