अनपेक्षित निकाल..
By Admin | Updated: August 28, 2014 02:25 IST2014-08-28T02:25:15+5:302014-08-28T02:25:34+5:30
वाशिम जिल्हा नियोजन व विकास समिती निवडणूक

अनपेक्षित निकाल..
वाशिम : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय क्षेत्र ढवळून काढणार्या जिल्हा नियोजन व विकास समिती निवडणुकीच्या २७ ऑगस्टच्या धक्कादायक निकालातून राजकीय समीकरणं बदलत चालल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. हर्षदा दिलीपराव देशमुख व रजनी महादेव ताटके यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडून द्यावयाच्या २१ सदस्यांपैकी नागरी क्षेत्रातील एका सदस्यासह १0 जागांवरचे सदस्य या आधीच अविरोध निश्चित झाले होते. उर्वरित तीन प्रवर्गातील ११ जागांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने २६ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य मिळून २१ सदस्य निवडून देणे अपेक्षीत होते. या २0 सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधील २, अनुसूचित जाती स्त्री २, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री १, नागरिकांचा मागास प्रवर्गातून ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा सदस्यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून द्यावयाच्या ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा एकूण ११ जागांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज दाखल असल्याने या जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून नथ्थू कापसे, राजेश जाधव, देवेंद्र ताथोड, सर्वसाधारण प्रवर्गातून स्वप्नील सरनाईक, गजानन अमदाबादकर, विकास गवळी, चंद्रकांत ठाकरे व विश्वनाथ सानप तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून गौरी पवार, अन्नपूर्णा मस्के, शबानाबी अ. इमदाद हे उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अनपेक्षीत निकालाने राजकीय क्षेत्रातील समीकरण बदलाचे संकेत दिले आहेत.