स्कुलबसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाहय़ वाहतूक
By Admin | Updated: November 23, 2014 00:19 IST2014-11-23T00:19:23+5:302014-11-23T00:19:23+5:30
कारंजा तालुक्यातील प्रकार : प्रशासनाचे दुर्लक्ष.

स्कुलबसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची नियमबाहय़ वाहतूक
प्रफुल बानगावकर / कारंजा लाड
इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे गावागावात पेव फुटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी या शाळांनी स्कुल बससेवा सुरू केली; मात्र बहुतांश शाळांच्या स्कुलबसला व ऑटोला परिवहन विभागाची परवानगीच नाही. सर्व नियम पायदळी तुडवित कारंजा तालुक्यात स्कुलबसच्या नावे करण्यात येत असलेल्या अवैध वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
कारंजा शहरासह ग्रामीण भागातील मोठमोठय़ा गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवरील आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या ग्रामीण भागासह शहरात शाळा सुरू आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याचा आरोप करीत या शाळेतील पटसंख्या कशी करून स्व त:च्या शाळांमध्ये विद्यार्थी कसे वाढतील, याचाच प्रयत्न सर्वच लोकप्रतिनिधी करतात. यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे टाकण्याचा कल वाढला आहे. हिच मानसिकता हेरून अनेकांनी गावागावात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दुकानदारी सुरू केली आहे. विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी स्कूल बस सेवा देण्याचा सपाटा लावला आहे. घरापासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना निशूल्क नेले जात असल्याने पालकही या शाळांकडे आकर्षित झाले आहे.