मालेगावचे सरपंच माने यांच्याविरुध्द अविश्वास
By Admin | Updated: November 12, 2014 23:24 IST2014-11-12T23:24:50+5:302014-11-12T23:24:50+5:30
१३ सदस्यांनी दाखल केला प्रस्ताव.

मालेगावचे सरपंच माने यांच्याविरुध्द अविश्वास
वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या भाजप सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले असले तरी, जिल्ह्यातील भाजप नेते डॉ. विवेक माने यांचे मालेगाव ग्रामपंचायत मधील सरकार अल्पमतात आले आहे. ग्रामपंचायतीच्या तब्बल १३ सदस्यी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्या तील राजकारणात कमालीची खळबळ उडाली आहे.
गत काही दिवसांपासून मालेगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरपंच माने व काही सदस्यांमध्ये कुरबुर होत असल्याची चर्चा शहरभर होती. अखेर सरपंच डॉ.माने यांच्या विरुध्द ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांनी १२ नोव्हेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. सदस्यांना विश्वासात घेवून काम करीत नाही तसेच गावा तील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. या कारणावरुन हा अविश्वास प्रस्ताव दाखल कण्यात आला.
मालेगावचे तहसीलदार विघाते यांच्याकडे हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी ५ दिवसानंतर म्हणजे १७ नोव्हेंबरला बहुमत सिध्द करण्यासाठी विशेष सभा बोलाविली आहे. ११ नोव्हेंबर २0११ मध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपण्याला अद्याप २ शिल्लक आहेत. तर दुसरीकडे मालेगाव नगर पंचायतीची घोषणा झाली आहे. त्याचे नोटीफीकेशन कोणत्याही क्षणी निघु शकते त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेवू शकते. याकडे मालेगाव वासीयांचे लक्ष लागून आहे. आता सर्व १३ सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत.
दरम्यान माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याची प्रतिक्रीया सरपंच डॉ. विवेक माने यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.