१ लाख क्विंटलवरच कापूस खरेदी केंद्रांची उलंगवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:54+5:302021-02-05T09:25:54+5:30
गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार निसर्गाच्या अनियमितेचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान केले ...

१ लाख क्विंटलवरच कापूस खरेदी केंद्रांची उलंगवाडी
गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार निसर्गाच्या अनियमितेचा फटका सहन करावा लागला. अतिवृष्टीसह परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान केले असतानाच, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आली. त्यात शासनाने मध्यम धाग्याच्या कपाशीला प्रती क्विंटल ५,६१५, तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,७२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषित केले असताना बाजारात अवघ्या ५,००० ते ५,२०० रुपये प्रती क्विंटल दराने कपाशीची खरेदी केली जात होती. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन सीसीआयने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू केली. त्यात सुरुवातीला मंगरुळपीर, अनसिंग येथे, तर त्यानंतर कारंजा येथे दोन, कामरगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी एक केंद्रही सुरू केले. कारंजा, मंगरुळपीर आणि अनसिंग येथील केंद्रावर सुरुवातीला विक्रमी आवक झाली. त्यानंतर मात्र, खासगी बाजारात कपाशीचे दर वाढू लागल्याने शासकीय केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ करणे सुरू केले. परिणामी, गेल्या पाच दिवसांपासून शासकीय केंद्रावर एक क्विंटल कपाशीचीही खरेदी होऊ शकली नाही, तर १९ नोव्हेंबर, २०२० ते १ फेब्रुवारी, २०२१ दरम्यानच्या काळात सर्व शासकीय केंद्रांवर मिळून केवळ १ लाख क्विंटल कापसाची खरेदी होऊ शकली आहे.
--------
केंद्रनिहाय खरेदीचे प्रमाण
केंद्र खरेदी (क्विंटल)
मंगरुळपीर ३५,२६५
अनसिंग ३२,१९०
कारंजा ३१,११०
कामरगाव १,६००
मानोरा ०००