दोन ऑटोरिक्षांच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: October 19, 2014 00:28 IST2014-10-19T00:28:55+5:302014-10-19T00:28:55+5:30
दोघे गंभीर जखमी, पोहरादेवी ते वाईगौळ रस्त्यावरील घटना.

दोन ऑटोरिक्षांच्या धडकेत एक ठार
मानोरा (वाशिम): अवैध वाहतूक करणार्या दोन ऑटोरिक्षांची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पोलिस स्टेशन मानोरा अंतर्गत येणार्या पोहरादेवी ते वाईगौळ रस्त्यावर १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू अशोक भालेराव ( ४२), असे मृतकाचे नाव असून, तो पोहरादेवी येथील रहिवासी होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये कमलाबाई किसन राऊत (६५) आणि मालू अरुण राऊत (४२), यांचा समावेश आहे. पोहरादेवी येथील विष्णू अशोक भालेराव, कमला किसन राऊत, मालू अरूण राऊत हे १७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान एमएच २९ डब्ल्यू-९२८७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये बसून दिग्रसहून पोहरादेवीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेला एमएच ३७ बी-६३११ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाची आणि त्यांच्या ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात कमलाबाई किसन राऊत यांच्या पायाला, मालू अरूण राऊत हिचे पाय, डोळे व हाताला गंभीर दुखापत झाली, तर विष्णू अशोक भालेराव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या तिघांवरही सुरुवातीला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले; परंतु गंभीर जखमी झालेल्या विष्णू अशोक भालेराव यांचा वाटेतच मृत्यू झाला. कमला किसन राऊत यासुद्धा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.