दोन कोटींचा कर थकीत, विकास कसा करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:51+5:302021-08-15T04:41:51+5:30
शिरपूर जैन : प्रामुख्याने विविध कर वसुलीवरच अवलंबून असलेल्या ग्रामपंचायती आता कराची थकबाकी वाढल्याने अडचणीत आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील ...

दोन कोटींचा कर थकीत, विकास कसा करणार?
शिरपूर जैन : प्रामुख्याने विविध कर वसुलीवरच अवलंबून असलेल्या ग्रामपंचायती आता कराची थकबाकी वाढल्याने अडचणीत आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन येथे गावातील कुटुंबांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात २ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गावाचा विकास कसा करावा, असा प्रश्न आहेच, शिवाय गावकऱ्यांना सुविधा कशा उपलब्ध कराव्यात, हे कोडेही ग्रामपंचायत पडले आहे.
वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरपूर ग्रामपंचायतची ओळख आहे. जवळपास २० हजारांहून अधिक लोकसंख्या व १४ हजार मतदार असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ आहे. मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या व गावाचा विस्तारही झाला. गावातील मुख्य रस्ते दुरुस्ती व सांडपाण्याच्या नाल्यांची सफाई व दुरुस्तीवर ग्रामपंचायतचा मोठा खर्च होतो. ही कामे ग्रामस्थांकडील घरपट्टी व पाणीपट्टी कर गोळा करून करावी लागतात आणि याच रकमेतून गावात विविध विकासकामेही केली जाऊ शकतात. मात्र मागील दहा-बारा वर्षांपासून वसुलीबाबत ग्रामपंचायत ढिसाळ धोरण अवलंबत असल्याने करापोटी गावातील कुटुंबांकडे जवळपास दोन कोटी रुपये थकबाकी झाली आहे. त्यामुळे गावाचा विकास करणे दूरच, गावकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरविणेही कठीण झाले आहे.
----------
कर्मचाऱ्यांचे वेतनही देणे कठीण
शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत कुटुंबांकडे पाणीपट्टी आणि घरपट्टीपोटी तब्बल दोन कोटी रुपये थकीत असल्याने ग्रामस्थांना सुविधा देणे अशक्य होत आहेच, शिवाय ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणेही प्रशासनाला कठीण झाले असल्याचे मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.
-----------------
पाणीपट्टीचे ७० लाख थकीत
शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत रहिवासी कुटुंबांकडे जवळपास दोन हजार नळ कनेक्शन आहेत. त्यापोटी नागरिकांकडे ६० ते ७० लाख रुपये थकबाकी असून, ही थकबाकी वसूल करताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकीनव आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनाही संकटात सापडण्याची भीती आहे.
----------------
घरपट्टीचे १.४० कोटी थकीत
शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपट्टीपोटी ६० ते ७० लाख थकीत असतानाच घरपट्टीपोटी १.४० कोटी रुपयांपर्यंतची थकबाकी आहे. थकीत कर भरण्यासाठी ग्रामपंचायतने ग्रामस्थांना आवाहन केले, नोटीसही दिल्या, तसेच घरोघर फिरून वसुलीचा प्रयत्नही केला; परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
------------
पाणीपुरवठा योजनेचे वीजबील थकले
शिरपूर ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टीपोटी १.४० कोटी, तर पाणीपट्टीपोटी ७० लाख रुपये मिळून एकूण दोन कोटींच्या वर कर थकीत आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत नसल्याने गावातील पाणीपुरवठा योजनेचे ४० लाख रुपयांचे वीजबिलही थकले आहे. त्यामुळे योजना संकटात असल्याचे दिसते.
------------
कोट : ग्रामपंचायत अंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टी स्वरूपाची जवळपास दोन कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असल्याने प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासह इतर लहान-मोठी कामे करण्यास अडचणी निर्माण होत आहे. पाणीपुरवठा वीजबिल भरणा रखडण्यासह कार्यालयीन खर्चात अडचणी येत आहेत. वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र कोरोनामुळे मागील दीड वर्षात वसुलीमध्येही अडचणी निर्माण झाल्या.
- भागवत भुरकाडे,
ग्रामविकास अधिकारी, शिरपूर