बाराव्या शतकातील मंदिर दुर्लक्षित

By Admin | Updated: December 9, 2014 00:57 IST2014-12-09T00:57:02+5:302014-12-09T00:57:02+5:30

चक्रधर स्वामींच्या स्मृती जपणारे मंदिर : लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे.

Twelve-century temple neglected | बाराव्या शतकातील मंदिर दुर्लक्षित

बाराव्या शतकातील मंदिर दुर्लक्षित

नाना देवळे / मंगरुळपीर(वाशिम)
महानुभाव पंथाचे संस्थापक आणि प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या जागेवर वाशिम जिल्हय़ातील मंगरुळपीर येथे अरुणावती नदीच्या काठावर ८00 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. या मंदिरावर साजरा के ल्या जाणार्‍या विविध उत्सवानिमित्त देशभरातून शेकडो भाविक येथे येतात; मात्र हे मंदिर दुर्लक्षित असल्याने विकासापासून कोसो दूर दिसून येत आहे.
श्री चक्रधरस्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्‍वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून, त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला, अशी आख्यायिका आहे.
चक्रधरस्वामी बाराव्या शतकात जीव उद्धारण, अहिंसा, अंधश्रद्धा, जातीभेद निर्मूलनाचे कार्य करीत देशभर भ्रमण करीत होते. चक्रधरस्वामी भ्रमण करीत वाशिम जिल्हय़ातील मंगरुळपीर येथे आले. त्यावेळी एका देवीच्या मंदिरावर त्यांनी मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी त्यांचा शिष्य कपडे धुण्यासाठी नदीवर गेला. बराच वेळ तो परत न आल्यामुळे चक्रधर स्वामी त्याला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचा शिष्य वाळूचे दोन खोपे तयार करून त्यांना पाहत एक श्रीकृष्ण महाराजांचे, तर एक चक्रधर स्वामींचे मंदिर असे मनाशीच पुटपुटत असल्याचे त्यांना दिसले. त्याक्षणी चक्रधर स्वामींच्या तोंडू उद्गार निघाले ह्यव्वा बाळा खेळ खेळावाही असाच की, तो खेळतानाही ईश्‍वराचा विसर पडू नयेह्ण. यावेळी चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी उभे राहिले होते, त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या जागेवर त्यांचे छोटेसे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरावर आजच्या घडीला महानुभाव पंथाचे अनुयायी वास्तव्य करून त्याची देखरेख करीत आहेत. हे मंदिर देशभरात प्रसिद्ध असून, या मंदिरावर दरवर्षी भाद्रपद शुद्ध द्वितीयेला श्री चक्रधर स्वामी यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवानिमित्त देशभरातील विविध ठिकाणाहून महानुभाव पंथाच्या अनुयायांसह हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव तसेच दत्त जयंती आदी उत्सवही साजरे करण्यात येतात. या मंदिराच्या देखभालीची जबाबदारी महानुभाव पंथाच्या अनुयायांकडे आहे.

Web Title: Twelve-century temple neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.