नैराश्यातून वळले साहित्य क्षेत्राकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:43+5:302021-02-05T09:26:43+5:30
वाशिम : पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे यांना वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडविण्याची इच्छा होती; परंतु ‘एमबीबीएस’च्या प्रथम ...

नैराश्यातून वळले साहित्य क्षेत्राकडे !
वाशिम : पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे यांना वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडविण्याची इच्छा होती; परंतु ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षातच अपयश मिळाल्याने ते खचले आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच ते साहित्य क्षेत्राकडे वळले.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन हे कवी नामदेव चंद्रभान कांबळे उपाख्य ना.चं. कांबळे यांचे मूळगाव. वडील चंद्रभान व आई भुलाबाई यांच्या पोटी १ जानेवारी १९४८ साली त्यांचा जन्म झाला. त्यांना चार भाऊ व तीन बहिणी. यात ते सहाव्या क्रमांकाचे. शिरपूर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नागपूर येथे बीएस्सी प्रथम वर्षाचे शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस प्रथम वर्षात प्रवेश घेतला; मात्र एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेत त्यांच्या पदरी अपयश आले. त्यामुळे निराश होऊन त्यांनी परत शिरपूर जैन गाठले. गावात परतल्यानंतर त्यांनी गावातच सुरुवातीला एक ते दोन वर्ष खासगीमध्ये चौकीदारीची नोकरी पत्करली. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी बीए. डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतही त्यांनी १९७५ साली वॉचमनची नोकरी स्वीकारली. ही नोकरी करीत असताना सन १९७७ साली त्यांची शिक्षक म्हणून राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत निवड झाली. मराठी विषय शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी १९८६ पर्यंत इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी हा विषय शिकविला, तर १९८६ नंतर २००५ पर्यंत त्यांनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मराठी हा विषय शिकविला. दरम्यान. १९७१ मध्ये मेहकर तालुक्यातील ईसवी येथील आशाबाई बांगर त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन मुले आहेत. लग्नापूर्वी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने त्यांच्या जीवनात एकूणच नैराश्य आले होते. यातून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. कविता लिहिण्याचा छंद जोपासत त्यांनी कथा, कादंबरी, ललित, भाषणे, समीक्षा, वैचारिक आदी विषयांवर आपली लेखणी झिजवत पुढचा प्रवास सुरू ठेवला. एकूण बावीस पुस्तके त्यांनी विविध विषयांवर लिहून प्रकाशित केली आहेत. साहित्य अकादमी मिळवलेली ‘राघव वेळ’ ही त्यांची कादंबरी सर्वांची आवडती ठरली आहे.
--------
बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर लिखाण सुरू !
पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक ना.चं. कांबळे यांच्या आजवर ८ कांदबऱ्या, दोन कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन वैचारिक तसेच लेखसंग्रह आणि समीक्षा मिळून २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लिखाण अद्यापही सुरू असून, ते आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित ‘आंबेडकरांचे चरित्र’ हे ७०० ते ८०० पानांच्या पुस्तकाचे लिखाण करीत आहेत. पुणे येथील राजहंस प्रकाशन त्यांचे हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.