विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 14, 2015 02:29 IST2015-12-14T02:29:02+5:302015-12-14T02:29:02+5:30
मानोरा तालुक्यातील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा.

विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न
मानोरा (जि. वाशिम): पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माहुली येथील उमेश विष्णू चव्हाण (३0) या युवकास विष पाजून जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पंचाळा येथील चौघांविरुद्ध मानोरा पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, माहुली येथील उमेश विष्णू चव्हाण यांच्या पत्नीकडून पंचाळा येथील त्यांचा नातेवाईक आरोपी पंकज विकास राठोड याने घर बांधण्यासाठी ५0 हजार रुपये घेतले होते. सदर रकमेस चार ते पाच वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर ऑक्टोबर २0१५ मध्ये फिर्यादीने आपल्या पत्नीसह पंचाळा येथे पंकज राठोडकडे जाऊन थकबाकी रकमेची मागणी केली. त्यावेळी आरोपी तुकड्यादास नरसिंग राठोड (५५), मिथुन तुकड्यादास चव्हाण (२८), लखन तुकड्यादास चव्हाण (२५) यांनी अश्लील भाषेत फिर्यादीला शिविगाळ केली. तसेच मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी त्याच्या प त्नीसह २६ नोव्हेंबर २0१५ रोजी उमरी खुर्द येथे सामकी माता मंदिरात नवस फेडण्यासाठी गेला असता आरोपी तुकड्यादास राठोड व मिथुन राठोड यांनी फिर्यादी उमेश चव्हाणला पकडून ठेवले आणि आरोपी लखन राठोड याने फिर्यादीच्या पत्नीस पकडले, तर आरोपी पंकज विलास राठोडने फिर्यादीला जबरी विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी भोवळ येऊन पडला. त्याच्यावर मानोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे पाठविण्यात आले. प्रकृती चांगली झाल्यानंतर फिर्यादीने १२ डिसेंबर रोजी मानोरा पोलिसांत फिर्याद दिली. यावरुन आरोपीविरुध्द कलम ३0७, ५0६, अधिक ३४ भादंवी गुन्हा दाखल करुन अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहे.