आदिवासीबहुल पिंपळवाडी गावात शौचालय बांधकामाचे वारे!
By Admin | Updated: February 24, 2015 00:29 IST2015-02-24T00:29:41+5:302015-02-24T00:29:41+5:30
महिला पदाधिकारी सरसावल्या; ८५ टक्के शौचालयाचे काम युद्धपातळीवर सुरू.

आदिवासीबहुल पिंपळवाडी गावात शौचालय बांधकामाचे वारे!
अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम):आदिवासी व बंजाराबहुल असलेल्या पिंपळवाडीत महिलांनी महिलांमध्ये जनजागृती केल्याचे चांगले परिणाम आता दृष्टिपथात येत आहेत. १५0 कुटुंब असलेल्या या गावात १२५ शौचालयांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेले निर्मल भारत अभियान वाशिम जिल्ह्यातही राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट टाकण्यात आली आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छता अभियान कक्षाच्यावतीने घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. आदिवासी व बंजाराबहुल असलेल्या मालेगाव तालुक्यातील पिंपळवाडी येथे सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा तिनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यपदाची धुरा महिलांच्या हाती आहे. सरपंच आशाबाई देवीसिंग पवार, जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा घुगे व पंचायत समिती सदस्या अन्नपुर्णा भुरकाडे यांनी पिंपळवाडीत शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाचे राम श्रृंगारे व टीम आणि मालेगाव कक्षाचे तालुका समन्वयक गौतम कंकाळ, गट समन्वयक सदानंद राऊत आदींनी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन दिले. १५0 कुटुंब असलेल्या पिंपळवाडीत दीड महिन्यापूर्वी केवळ तीन शौचालय होते. दीड महिन्यातच चित्र पालटले असून, आता १२५ शौचालयांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. आता केवळ २२ शौचालयांचे बांधकाम बाकी आहे. लवकरच या २२ कुटुंबांच्या घरीदेखील शौचालय बांधकामाचा श्रीगणेशा केला जाईल, असा विश्वास सरपंच आशाबाई देवीसिंग पवार यांनी व्यक्त केला.