कारंजा, मानोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:35+5:302021-08-25T04:46:35+5:30
वाशिम : कारंजा तालुक्यातील धामणी, मानोरा तालुक्यातील इंझोरी, दापुरा, कुपटा, कोलार यांसह अन्य गावांतील रुग्णांवर बोगस डॉक्टरांकडून उपचार होत ...

कारंजा, मानोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार!
वाशिम : कारंजा तालुक्यातील धामणी, मानोरा तालुक्यातील इंझोरी, दापुरा, कुपटा, कोलार यांसह अन्य गावांतील रुग्णांवर बोगस डॉक्टरांकडून उपचार होत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात सापडत आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासंदर्भात डॉ. पद्माकर मिसाळ यांच्यासह अन्य डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २४) जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना साकडे घातले.
धामणी खडी येथील डॉ.पद्माकर देवीदास मिसाळ यांच्या निवेदनानुसार, धामणी येथे अनेक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. अनेकांकडे कोणतीही पदवी नाही. कोरोनाकाळात या बोगस डॉक्टरांनी अनेक रुग्णांवर उपचार केले. यासंदर्भात २२ जुलै रोजी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. परंतु, कारवाई शून्य आहे. रमेश आप्पाराव वानखडे यांच्या निवेदनानुसार इंझोरी, दापुरा, कुपटा, कोलार, गिरोली, धामणी, जवळ, सिंगोह, आसोला, मानोरा, पोहरादेवी, वार्डी, गिर्ज, खापरदरी, तळप, शेंदुरजना आदी गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट अंदाजे १० वर्षापासून आहे. ते नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. संजय देवीदास मिसाळ यांच्या निवेदनानुसार मोहरी येथील बोगस डॉक्टर हे रुग्णांवर उपचार करीत आहेत. बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
००००००००००००
बोगस डॉक्टरांवर कारवाई होईल का?
बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच, ग्रामीण भागातही बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार होत असल्याचे तक्रारीतून समोर येत आहे. या बोगस डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची तपासणी आरोग्य विभागाकडून होणार का, असा प्रश्न अधिकृत डॉक्टरांमधून उपस्थित केला जात आहे.