मंदिरातील दानपेट्या फोडून रक्कम लंपास
By Admin | Updated: August 29, 2016 00:07 IST2016-08-29T00:07:56+5:302016-08-29T00:07:56+5:30
मंदिरांमध्ये असलेल्या दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपये लंपास केले.

मंदिरातील दानपेट्या फोडून रक्कम लंपास
वाशिम, दि. २८: शहरातील विनायकनगर, गजानननगर या परिसरातील मंदिरांमध्ये असलेल्या दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपये लंपास केले. ही घटना २६ व २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीदरम्यान घडली. शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी आययूडीपी कॉलनीमध्ये भरदिवसा चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. विनायक नगर, गजानन नगर, सिव्हिल लाइन परिसरात असलेल्या विविध मंदिराच्या दानपेट्या फोडून त्यामधील रक्कम लंपास करण्यात अज्ञात चोरट्यांना यश आले. या घटनेची फिर्याद वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये गजानन देव यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांची गस्त नसल्यामुळे चोरटे याचा फायदा घेत असल्याचे उघडकीस येत आहे. रात्रीच्या सुमारास बिट मार्शलचे कर्तव्य पार पाडण्यासाठी नेमून दिलेले अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे या सर्व घटनांमधून अधोरेखित होत असून पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी वाशिम शहरवासीयांमधून जोर धरत आहे.