शेतकऱ्यांना निर्यातक्षम भेंडी उत्पादनाबाबत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:14+5:302021-02-05T09:26:14+5:30
तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी भेंडी हे कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे पीक आहे व या पिकात निर्यातीसाठी खूप ...

शेतकऱ्यांना निर्यातक्षम भेंडी उत्पादनाबाबत प्रशिक्षण
तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी भेंडी हे कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे पीक आहे व या पिकात निर्यातीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव असून, शेतकरी गटांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. लागवडीविषयी शेतकऱ्यांना माहिती देताना त्यांनी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत उन्हाळी, तर जून-जुलै महिन्यात पावसाळी भेंडीची लागवड सरी वरंबा पद्धतीने किंवा जोड ओळ पद्धतीने २.५ ते ३ फूट अंतरावर करून एकरी ६० ते ६५ हजार रोपे राखावीत, असे सांगितले. तसेच एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड रोग व्यवस्थापन करून उच्च प्रतीचे उत्पादन पद्धती विशद केली. संजीवकांचा बीज प्रक्रियेमध्ये आणि तोडणीच्या हंगामात वापर, तोडणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन याविषयीसुद्धा माहिती दिली. डॉ. रवींद्र काळे यांनी शेतीवरील उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यावर शेतकरी बांधवांनी विचार करावा व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खताचा व जिवाणू खताचा वापर करून उत्पादनाबरोबर जमिनीचे आरोग्य राखावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.