वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!
By Admin | Updated: May 15, 2017 01:29 IST2017-05-15T01:29:07+5:302017-05-15T01:29:07+5:30
केशवनगर गावानजिकची घटना : ट्रॅक्टर चालकास अटक

वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : रिसोडहून वाळू घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने केशवनगर या गावानजिक दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला; तर सातवर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
दापुरी येथील शालीकराम शेषराव जाधव (वय २५) हे त्यांच्या भावाचा मुलगा (पुतण्या) कर्तव्य शंकर जाधव (वय ७) यास घेऊन केशवनगर येथे जात होते. दरम्यान, रिसोडहून वाळू घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३७ २०७१) दुचाकीस (क्रमांक एमएच ३७ २५७९) जबर धडक दिली. यात शालिकराम जाधव हे गंभीर जखमी झाले; तर कर्तव्यचा पाय तुटून बाजूला पडला. उपचारासाठी नेत असताना शालिकराम जाधव यांचा मृत्यू झाला. कर्तव्य जाधव याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरची तोडफोड केली. घटनेची माहिती कळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, संजय रंजवे, मंगेश गोपनारायण यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी आरोपी मो. रफीक अ. गणी (रा. शिरपूर) यास पोलिसांनीे अटक केली.
वाहनचालकांप्रती गावकऱ्यांनी व्यक्त केला रोष
शालिकराम जाधव यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने दिलेली धडक एवढी जोरदार होती, की वाहन सुमारे २५ फूट घासत गेले. यादरम्यान गंभीर जखमी अवस्थेतील जाधव आणि त्यांच्या पुतण्याला मदतीची गरज असताना रस्त्यावरून धावणाऱ्या एकाही खासगी वाहनधारकाने माणुसकी दाखविली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत एकही वाहन बराच वेळ दापुरी येथून जाऊ दिले नाही.