डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:06+5:302021-02-05T09:25:06+5:30

पूर्वी नांगरणे, रोटर मारणे, खुरटणी, सरी सोडणे, पेरणी, पालाकुट्टी करणे, रोटर मारून रस्ता तयार करणे, डंपिंग, शेत लेव्हल करणे ...

Tractor cultivation also became more expensive due to increase in diesel prices | डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

पूर्वी नांगरणे, रोटर मारणे, खुरटणी, सरी सोडणे, पेरणी, पालाकुट्टी करणे, रोटर मारून रस्ता तयार करणे, डंपिंग, शेत लेव्हल करणे आदी स्वरूपातील मशागतीची कामे बैलांच्या साह्याने केली जायची; मात्र त्यास अधिक वेळ लागायचा. सोबतच मजुरांचीही निकड भासत असे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा आधार घेतला; परंतु डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून मशागतीच्या एकरी खर्चातही गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाली आहे. विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांचा सामना करताना हतबल झालेला शेतकरी डिझेलच्या दरवाढीमुळे अधिकच अडचणीत सापडला आहे.

......................

मशागतीचे दर (प्रतिएकर)

नांगरणी - १८००, २५००

रोटर - १७००, २५००

खुरटणी - १०००, १५००

नांगरणे, रोटर - ७००, १०००

पेरणी - १४००, २०००

पालाकुट्टी - १३००, २०००

...............

कोट :

सध्या शेतात नांगरणी आणि रोटर फिरविण्याचे काम सुरू आहे. ट्रॅक्टरशिवाय ही कामे होणे सध्यातरी अशक्य आहे. अशा स्थितीत डिझेलचे दर वाढल्यामुळे मशागतीच्या एकरी खर्चातही दुप्पटीने वाढ झाली आहे.

- राजेश पाटील कडू

ट्रॅक्टर मालक

.....................

मशागतीचा एकरी १६००० रुपये खर्च

१) गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासह कापूस, तूर, हळद या पिकांवरील विविध रोगांमुळे शेतकरी जेरीस आले. अशात डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्चही महागला आहे.

२) शेत नांगरणे, रोटर मारणे, खुरटणी, सरी सोडणे, पेरणी, पालाकुट्टी करणे यासह अन्य स्वरूपातील सर्वच मशागतीच्या कामांचे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

३) प्राप्त माहितीनुसार, सध्या मशागतीचा एकरी १६००० रुपये खर्च येत असून, डिझेल आणि स्पेअर पार्टच्या दरात झालेल्या वृद्धीमुळेच खर्चात वाढ झालेली आहे.

..................

कोट :

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. रबी हंगामातूनही विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याची स्थिती आहे. अशात डिझेल दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- प्रदीप इढोळे, शेतकरी

...............

शेत मशागतीची बहुतांश कामे ही ट्रॅक्टरशिवाय होणे अशक्यच आहे. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवत असली तरी पैशांची जुळवाजुळव करून मशागतीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मशागतीच्या खर्चात गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

- दिलीप मुठाळ, शेतकरी

Web Title: Tractor cultivation also became more expensive due to increase in diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.