वाशिमसाठी ‘टोइंग व्हॅन’ मंजूर
By Admin | Updated: June 12, 2016 02:12 IST2016-06-12T02:12:46+5:302016-06-12T02:12:46+5:30
कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी होणार उपयोग.

वाशिमसाठी ‘टोइंग व्हॅन’ मंजूर
वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली आहे. भररस्त्यावर वाहनधारक आपली वाहने उभी करीत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे वृत्त लोकमतने वारंवार प्रकाशित केल्याने याची पोलीस विभागाच्यावतीने दखल घेण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या मदतीसाठी टोइंग व्हॅन मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते शहरातून फिरणार आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणार्या वाहनांवर कारवाई अपेक्षित आहे. वाशिम शहरात रस्त्यावर वाहन उभे आढळून आल्यास टोइंग व्हॅनद्वारे ते उचलून नेण्यात येणार आहे. ते उचलून नेल्यानंतर वाहनधारकाला ते वाहन जेथे जमा आहे, तेथून मिळणार आहे. रस्त्याच्या मधोमध वाहन उभे केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्यावतीने १00 रुपये दंड आकारल्या जात होता. तो दंड आता १५0 रुपये वाहनधारकाला भरावा लागणार आहे. रस्त्यात वाहन उभे केले म्हणून १00 रुपये दंड व ५0 रुपये टोइंग व्हॅन खर्च, असे एकूण १५0 रुपयांचा भुर्दंंड वाहनधारकांना पडणार आहे. रस्त्यात उभे असलेल्या फेरीवाल्यांना सुद्धा दंड आकारण्यात येणार आहे. हातगाडी चालकांना ३00 रुपये दंड व मुंबई पोलीस कायदा १0२/११७ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली. तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.