संचालक पदासाठी आज मतदान
By Admin | Updated: May 5, 2015 00:28 IST2015-05-05T00:28:00+5:302015-05-05T00:28:00+5:30
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक ; नऊ उमेदवार रिंगणात.

संचालक पदासाठी आज मतदान
वाशिम : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी ५ मे रोजी जिल्हय़ातील चार मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, कारंजा व मानोरा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून बँकेत कुणाला पाठवायचे, याचा फैसला जिल्हय़ातील २७९ मतदार करणार आहेत.
दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी जिल्हय़ातील ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २३ जणांनी माघार घेतल्याने आणि दोन जागा अविरोध झाल्याने आता नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात लढत देत आहेत. मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मालेगाव तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप जाधव आणि प्रकाश पाटील कुटे यांच्यात सरळ लढत होत आहे. वाशिम तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात एका जागेसाठी भागवतराव कोल्हे, महादेवराव काकडे व नामदेवराव इंगळे यांच्यात तिहेरी लढत होत आहे. कारंजा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात विजय काळे व श्रीधर कानकिरड यांच्यात सरळ लढत होत आहे. मानोरा तालुका सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात उमेश ठाकरे व सुरेश गावंडे यांच्यात सरळ लढत होत आहे. ५ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान जिल्हय़ातील चार मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.