सराफा दुकानांच्या बंदमुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ
By Admin | Updated: March 8, 2016 02:25 IST2016-03-08T02:25:10+5:302016-03-08T02:25:10+5:30
आंदोलन तीव्र; कारंजा तालुक्यात लाखोंची उलाढाल ठप्प.

सराफा दुकानांच्या बंदमुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ
कारंजा लाड (जि. वाशिम) : शासनाने सराफा व्यावसायिकांसाठी एक टक्का उत्पादन शुल्क लावल्याने सोने खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. कारंजा तालुक्यातील सुमारे शंभर सराफा दुकाने बंद असल्याने गत सहा दिवसांपासून कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे. याशिवाय ऐन लग्नाच्या हंगामात गजबजलेल्या सराफा बाजारांत शुकशुकाट पसरला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एखाद्या ग्राहकाने दोन लाखांची सोने खरेदी केली तर त्याला पॅनकॉर्ड दाखवावे लागणार आहे. याशिवाय उत्पादन शुल्क एक टक्का आकारण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे सोने खरेदी-विक्री व्यवहारावर विपरित परिणाम होणार आहे, असे चंद्रपूर सराफा असोसिएशनने म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने २ मार्चपासून बंद ठेवली आहेत. कारंजा शहरात सुमारे ४५ ते ५0 सराफा दुकाने आहेत. तालुक्यात सराफा दुकानांची संख्या शंभरच्या घरात आहे. रोजच्या घडीला कारंजा तालुक्यात २५ ते ३0 लाखांची उलाढाल होते. दररोज या दुकानातून कोट्यवधींची उलाढाल होते. २ मार्चपासून जिल्ह्यातील सराफा दुकाने बंद असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प पडली आहे. कारंजातील सराफा बाजार प्रसिद्ध असून, येथील सराफ लाइनवर सराफा व्यावसायिकांची चाळच आहे. जिल्हाभरातील ग्राहक येथे येत असल्याने नेहमी हा परिसर गजबजलेला राहतो; मात्र मागील सहा दिवसांपासून या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. विशेष म्हणजे, सध्या लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे या दिवसात सोने-चांदीच्या दागिन्यांची जोरात खरेदी होत असते; मात्र सतत सहा दिवस ही दुकाने बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.