विजांच्या कडकडाटासह वादळी वा-याचे थैमान
By Admin | Updated: March 1, 2016 01:16 IST2016-03-01T01:16:51+5:302016-03-01T01:16:51+5:30
वाशिम जिल्ह्यातील आगरवाडी येथे वीज पडून साहित्याचे नुकसान.

विजांच्या कडकडाटासह वादळी वा-याचे थैमान
वाशिम: जिल्ह्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटामुळे फळबागांसह कांदा पिकाचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील आगरखेड येथे वीज पडून गोठय़ाचे नुकसान झाले. जांभरूण जहागीर येथे एका खासगी कंपनीचे लाखो रुपयांचे टीनाचे शेड कोसळले.
जांभरूण जहागीर येथील मनीबाई अँग्रो इंडस्ट्रीजचे टीनशेड २६ फेब्रुवारी रोजी आलेल्या वादळामुळे कोसळले. त्यामुळे गोविंद अग्रवाल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अंचळ येथे चक्रीवादळ व गारपीट; लाखोंचे नुकसान
अंचळ येथे २८ फेब्रुवारीच्या रात्री चक्रीवादळासह गारपीट व पाऊस झाल्याने गावातील घरांचे व शेतातील पिकांचे नुकसान झाले. रात्री १२ वाजता अचानक चक्रीवादळाला सुरुवात होऊन गारपीट, पाऊस आणि वारा यामुळे गावातील काही घरांवरील पत्रे उडण्यास सुरुवात झाली. हवेच्या वेगामुळे गावातील विजेच्या तारा सर्व गावामध्ये रस्त्यावर पडल्या. मारोती संस्थान अंचळच्या मंदिरावरील पितळी कळस खाली कोसळला. जि.प.शाळेच्या दोन खोल्यांवरील टिनपत्रे उडून भिंतींना तडे गेले. रात्रीची वेळ असल्याने सर्व गावकरी झोपेत असल्यामुळे जीवित हानी झाली नाही.
शेतामधील कापणीस आलेल्या गहू, हरभरा, काढणीला आलेला सत्रा, टोळकांदा, पपई, इत्यादी पिकांचे शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतातील मोठमोठी आंब्याची व इतर झाडे मुळासहित उन्मळून पडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमित झनक, जि.प.सदस्य सुधीर गोळे, पं.स.उपसभापती महादेव ठाकरे, पं.स. सदस्य डॉ.गजानन बाजड, तलाठी एच.आर.पवार, ग्रामसेवक पी.के.भुतेकर, लाइनमन काळे, कृषी सहायक मार्गे, इत्यादींनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. आ.अमित झनक यांनी नुकसानग्रस्तांची व्यक्तीश: भेट घेऊन माहिती घेतली व गावातील, घरांची, शेतातील पिकांचे नुकसान पाहून संबंधितांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
वीज पडून दीड लाखाचे नुकसान
रविवारच्या रात्रीदरम्यान रिसोड तालुक्यातील आगरवाडी शेतशिवारातील कोठय़ावर वीज पडून जवळपास दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जीवितहानी टळली. गावानजीक उद्धव वायभासे यांच्या गट नं. २३८ मधील शेतातील पक्क्या विटांच्या गोठय़ावर वीज पडून गोठय़ामधील २ सेट स्प्रिंकलर, एरंडीचे बियाणे, टिनपत्रे, गुरांचा चारा, शेती उपयोगी अवजारे, पीव्हीसी पाइप, सायकल, असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.