विनयभंगप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास
By Admin | Updated: March 8, 2016 02:27 IST2016-03-08T02:27:40+5:302016-03-08T02:27:40+5:30
खामगाव न्यायालयाचा निकाल.

विनयभंगप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास
खामगाव: खासगी वाहनाने प्रवास करीत असताना २८ वर्षीय कुमारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ७ मार्च रोजी खामगाव न्यायालयाने दिला. शिक्षा झालेला आरोपी बुलडाणा जिल्हा परिषदेचा कर्मचारी आहे. बुलडाणा ते खामगाव काळी-पिवळी टॅक्सी क्र.एम.एच.२८-एच.१३४८ ने ३0 जुलै २0११ प्रवास करीत असताना ईश्वर लक्ष्मण सूर्यवंशी (वय ४८) रा. सुंदरखेड बुलडाणा याने वाईट उद्देशाने २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. याबाबत विचारणा केली असता त्याने उलट शिवीगाळ करून चापट- बुक्क्यांनी मारहाण केली व हात पिरगळून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर प्रवाशांनी समजविल्यावरही आरोपीने जुमानले नाही, अशा आशयाची तक्रार बुलडाणा येथील २८ वर्षीय कुमारिकेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी ईश्वर लक्ष्मण सूर्यवंशी विरोधात कलम ३५४,५0४,५0६, ३२३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला व प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरणी ७ मार्च रोजी खामगाव न्यायालयात क्र.१ चे न्यायदंडाधिकारी जी.आर. ढेपे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व विशेष सरकारी सहायक अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तिवाद ग्राहय़ मानून आरोपीस भादंवि कलम ३५४ व ३२३ नुसार दोषी ठरविण्यात आले. कलम ३५४ मध्ये ३ महिने साधी कैद व २ हजार रुपये दंड तर कलम ३२३ मध्ये ३ महिने साधी कैद व १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा आरोपी ईश्वर लक्ष्मण सूर्यवंशी यास ठोठावण्यात आली. दंडाची ३ हजार रक्कम न भरल्यास १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे, असेही निकालात नमूद केले आहे.