जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली

By संतोष वानखडे | Published: January 2, 2024 02:50 PM2024-01-02T14:50:45+5:302024-01-02T14:50:56+5:30

जिल्ह्यात जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, आरक्षीत कोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Thousands of cases of caste verification were settled | जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली

जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली

वाशिम : जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित ठेवल्यास जिल्हाभरात आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर, एका महिन्यात प्रलंबित असलेली एक हजारावर प्रकरणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाली काढली. याबाबत २ जानेवारी रोजी शिवसैनिकांनी (ठाकरे गट) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जिल्ह्यात जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, आरक्षीत कोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यांनी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी समाजकल्याण विभागाचे कार्यालय गाठून जिल्हा जात पडताळणी समितीकडे पाठपुरावा केला. यावेळी त्यांना एका महिन्यात प्रलंबीत १ हजारावर प्रकरणे निकाली काढण्याचा शब्द दिला होता.

त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपल्या कार्याला वेग देत डिसेंबर २०२३ या महिन्याअखेर १ हजार १०९ प्रलंबीत जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे निकाली काढली. याबाबतची माहिती २ जानेवारी रोजी सहायक आयुक्त डाॅ. छाया कुलाल यांनी शिवसैनिकांना चर्चेदरम्यान दिली. जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर यांच्यासह शिवसैनिकांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, उपायुक्त कुलाल यांच्याशी चर्चा केली. 

एका महिन्यात ११०९ प्रकरणे निकाली

डिसेंबर २०२३ अखेर एका महिन्याच्या कालावधीत तब्बल १ हजार १०९ प्रलंबीत जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे निकाली काढली. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी त्रस्त विद्यार्थी, उमेदवारांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: Thousands of cases of caste verification were settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.