तृतीयपंथीयांची होणार नावनोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:54+5:302021-05-27T04:42:54+5:30
वाशिम : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने समाजकल्याण विभागाने तृतीयपंथीयांची नावनोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी ...

तृतीयपंथीयांची होणार नावनोंदणी
वाशिम : तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने समाजकल्याण विभागाने तृतीयपंथीयांची नावनोंदणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ट आहे. तृतीयपंथी, ट्रान्सजेन्डर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकाला समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. भेदभाव, सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. शासनामार्फत या समाज घटकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या समाज घटकांची सर्वांगिण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे, याकरिता वाशिम जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, वाशिम यांच्या कार्यालयात नावनोंदणी करावी. या नोंदणीकरिता सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो व वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत आणावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.