नेतन्सा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 11, 2016 01:47 IST2016-01-11T01:47:04+5:302016-01-11T01:47:04+5:30
एक महिन्याच्या कालावधीमध्ये १४ शेतक-यांचे विविध साहित्य लंपास.

नेतन्सा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
वाशिम: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नेतन्सा शेतशिवारात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घालत एक महिन्याच्या कालावधीमध्ये १४ शेतकर्यांचे विविध साहित्य लंपास केले. पोलिसांनी कुठल्याही घटनेची चौकशी न केल्यामुळे पीडित शेतकर्यांनी ७ जानेवारीला पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याकडे थेट आपली कैफियत मांडली आहे. नेतन्सा (ता. रिसोड, जि. वाशिम) शेतशिवारामध्ये गेल्या महिन्याभरात १४ चोरीची घटना घडल्या. यामध्ये शेतकर्यांच्या बैलजोड्या, मोटरपंप, स्प्रिंकलर साहित्य, नदीवरील इंजीन अशाप्रकारचे शेतीउपयोगी साहित्याचा समावेश आहे. शेतकर्यांनी शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदविल्या आहेत. नेतन्सा येथील ज्ञानबा चंद्रभान बाजड यांची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. जगन विश्राम बाजड यांचे शेतातील बोअरवेलमधील मोटर, शिवाजी बाजड यांचे शेतातील नदिवरील इंजीन, विजय शंकर बाजड यांचे शेतामध्ये असलेल्या विहिरीतल मोटरपंप अज्ञात चोरट्याने लंपास केला. उर्वरित शेतकरी बबन नामदेव बाजड, गजानन तुळशिराम बाजड, सुजित भगवानराव बाजड, राजू जनार्धन बाजड, सुरेश ज्ञानबा बाजड, रामकिसन तुळशिराम बाजड, विजय बळिराम बाजड, पवन लक्ष्मण बाजड, गजानन नामदेव बाजड व नारायण नामदेव बाजड यांच्या शेतामधील स्प्रिंकलरचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. दरम्यान, परिसरात चोर्यांचा घटनात वाढ झाली असून या घटनांना वेळीच घालणे गरजेचे झाले आहे. पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली.