चोरटा जेरबंद, १० दुचाकी जप्त; वाशिम शहर पोलिसांची कारवाई
By संतोष वानखडे | Updated: February 7, 2024 18:43 IST2024-02-07T18:43:07+5:302024-02-07T18:43:18+5:30
चोरीच्या मोटारसायकल विनाकागदपत्रांच्या विक्री करताना आढळून आल्यास किंवा चोरीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आले.

चोरटा जेरबंद, १० दुचाकी जप्त; वाशिम शहर पोलिसांची कारवाई
वाशिम : वाशिम शहर पोलिस स्टेशनला भादंवी कलम ३७९ अन्वये दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे बुधवारी शिवणी भेंडेकर (ता.मंगरूळपीर) येथील ३२ वर्षीय चोरट्यास ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले.
वाशिम शहर पोलिस स्टेशनला कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना, संतोष अशोकराव भेंडेकर (वय ३२) याचे नाव आरोपी म्हणून समोर आले. त्याला ग्राम शिवणी भेंडेकर येथून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याजवळून वाशिम शहर व विविध जिल्ह्यातील चोरीच्या एकूण १० मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. चोरीच्या मोटारसायकल विनाकागदपत्रांच्या विक्री करताना आढळून आल्यास किंवा चोरीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे आले.