ते करतात २० वर्षांपासून नागरिकांना मोफत पाणी पुरवठा
By Admin | Updated: May 1, 2017 19:48 IST2017-05-01T19:48:32+5:302017-05-01T19:48:32+5:30
वाशिम- मंगरुळपीर येथील औषध विक्रेते असलेले आसावा बंधू मागील २० वर्षांपासून स्वत:च्या खर्चाने लोकांना मोफत पाणी पुरवठा करीत आहेत.

ते करतात २० वर्षांपासून नागरिकांना मोफत पाणी पुरवठा
बारामहिने पाणपोई: मंगरुळपीरच्या आसावा बंधूृंचा उपक्रम
वाशिम: उन्हाळ्यात लोकांची तहान भागविणे, पाणपोई लावणे आदि उपक्र म अनेक सेवाभावी लोक राबवितात; परंतु मंगरुळपीर येथील औषध विक्रेते असलेले आसावा बंधू मागील २० वर्षांपासून स्वत:च्या खर्चाने लोकांना मोफत पाणी पुरवठा करतात, तसेच लोकांसाठी त्यांनी प्रतिष्ठाणासमोर बारमाही पाणपोई लावलेली आहे.
मंगरुळपीर येथील नंदकिशोर आसावा आणि त्यांचे धाकटे बंधू राजेश उर्फ मुन्नाभाऊ आसावा यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. गेली २५ वर्षांहून अधिक काळापासून ते हा व्यवसाय करीत आहेत. लोकांशी अतिशय चांगले संबंध राखणारे आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून ते तालुकाभरात परिचीत आहेत. व्यावसायिक असले तरी, लोकांना सहकार्य करण्यात ते सदैव अग्रेसर असतात. त्यांचे वडिल स्व. रामविलास आसावा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सेवाभावी विचाराने जवळपास २० ते २२ वर्षांपूर्वी पाणपोई सुरू केली. यासाठी त्यांनी स्वत: नगर परिषदेची नळ जोडणी घेतली. या नळाच्या माध्यमातून मागील २२ वर्षांपासूनच ते परिसरातील लोकांना मोफत पाणी पुरवठा करतात. त्यांच्या या उपक्रमाचा लाभ अनेक कुटुंबांना होत आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत नळाच्या पाणी पुरवठ्यात खंड पडल्यास ते टँकरने पाणी विकत घेऊन पाणपोईसाठी ठेवलेल्या माठांत भरतात. नित्य नियमाने या माठांची सफाई त्यांच्याकडून केली जाते. याच माठातील पाणी ते स्वत:ही पित असतात. कधीही कोणालाही त्यांनी नळाचे पाणी भरण्यापासून रोखले नाही किं वा कोणाकडूनही खर्चाची मागणी केली नाही. विशेष म्हणजे त्यांना प्रसिद्धीचा मुळीच मोह नसून, प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचे ते आवर्जून टाळत असतात.