केंद्रीय विद्यालय सुरू होण्यासंबंधी सूचना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:16+5:302021-02-05T09:25:16+5:30
................. पथनाट्य पथकांनी सादर केले अर्ज किन्हीराजा : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पथनाट्यांव्दारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य पथकांची ...

केंद्रीय विद्यालय सुरू होण्यासंबंधी सूचना नाही
.................
पथनाट्य पथकांनी सादर केले अर्ज
किन्हीराजा : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पथनाट्यांव्दारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला, पथनाट्य पथकांची निवड सूची तयार करण्यात येत आहे. त्यासाठी परिसरातील १० संस्थांनी २१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर केले आहेत.
...............
‘त्या’ इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची जुनी इमारत विनावापर पडून आहे. या इमारतीची पडझड झाली असून दुरुस्ती केल्यास केंद्रीय विद्यालयास ती वापरता येणे शक्य आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारीपर्यंत लागू
वाशिम : शासनाच्या २९ डिसेंबर २०२० च्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
............
शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन
जऊळका : ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ या योजनेत विद्यार्थ्यांची ‘फिटनेस असेसमेंट टेस्ट’ घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
.............
रेतीचा अवैध उपसा टाळण्याचे आवाहन
मानोरा : रेतीघाटाचे लिलाव अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे कुणीही अवैधरित्या रेतीचा उपसा करू नये, अशा सूचना तहसीलदार संदेश किर्दक यांनी दिल्या आहेत. अरुणावती नदीपात्र आणि खोराडी नाल्यातून होत असलेल्या रेती उपशावर निर्बंध लादल्याचे त्यांनी सांगितले.
...........
मेडशी परिसरात वित्तीय साक्षरता शिबिर
मेडशी : भारतीय रिझर्व बँक आणि भारतीय स्टेट बँकद्वारा संचालित नाबार्ड आणि क्रिसिल फाउंडेशनच्या वतीने मेडशी परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी वित्तीय साक्षरता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
................
परवाना नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई
वाशिम : वाहन चालविताना जवळ परवाना बाळगणे आवश्यक आहे. या नियमाची पायमल्ली करणा-यांवर शहर वाहतूक विभागाच्या वतीने पाटणी चौक येथे सोमवारी कारवाई करण्यात आली.
................
दिव्यांग लाभार्थ्यांना ‘यूडीआयडी’ची प्रतीक्षा
वाशिम : दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) वितरित केले जात आहे; मात्र अर्ज केलेल्या सुमारे १५० लाभार्थींना हे कार्ड अद्याप मिळालेले नाही.
.............
रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांमध्ये काही ठिकाणी अपहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली. परिणामी, ख-या मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली असून रोहयोची कामे सुरू करावी, अशी मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी जिल्हाधिका-यांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली आहे.
............
देयके अदा करण्यासाठी निवेदन
रिसोड : बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग व सिंचन विभागांतर्गत विविध स्वरूपातील कामे करूनही अनेक कंत्राटदारांची देयके मिळालेली नाहीत. देयके अदा करण्याची मागणी कंत्राटदार संघटनेने सोमवारी संबंधित त्या-त्या विभागांकडे केली.