लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या असून, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत केली नाही आदी आरोप करीत न्यायोचित मागणीसाठी ग्रामसेवकांनी ९ जुलैपासून पुकारलेले असहकार आंदोलन २० दिवसानंतरही सुरूच आहे. प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत असहकार आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामसेवक संघटनेने व्यक्त केल्याने ऐन खरिप हंगामात महत्त्वाचे अहवाल रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली तसेच चर्चाही केली. प्रलंबित मागण्यांसंदर्भात १० मे १७ मे दरम्यान असहकार आंदोलन पुकारले होते. दोन महिन्यात प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, दोन, तीन मागण्यांचा अपवाद वगळता अन्य मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचे कारण समोर करीत ग्रामसेवक संघटनेने ९ जुलैपासून बेमुदत असहकार आंदोलन पुकारले आहे. कोणत्याही सभेला न जाणे, वरिष्ठांना कोणतेही अहवाल न देणे, ग्राम पंचायत तपासणीकरीता दप्तर न दाखविणे असे या आंदोलनाचे स्वरुप आहे. २० दिवसानंतरही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही.
ग्रामसेवकांच्या आंदोलनावर तोडगा नाहीच; २० दिवसानंतरही असहकार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:48 IST