चोरी प्रकरण; सात अट्टल आरोपी गजाआड
By Admin | Updated: January 30, 2016 02:27 IST2016-01-30T02:27:06+5:302016-01-30T02:27:06+5:30
वाशिम जिल्ह्यातील चार पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई; चोरट्यांकडून १४.८0 लाखांचा मुद्देमाल जप्त.

चोरी प्रकरण; सात अट्टल आरोपी गजाआड
मंगरूळपीर/अनसिंग (जि. वाशिम): विविध प्रकारच्या चोर्या करून जिल्हा हादरून टाकणार्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर पोलीस प्रशासनाला यश आले आहे. आसेगाव, मंगरूळपीर, अनसिंग व जऊळका या चार पोलीस स्टेशनने राबविलेल्या संयुक्त कारवाईत वाशिम तालुक्यातील माळेगाव येथून सात अट्टल आरोपी २९ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाले. चोरट्यांकडून जवळपास १४ लाख ८0 हजार रुपयांचा माल जप्त केला. जिल्हय़ातील आसेगाव, मंगरूळपीर, अनसिंग व जऊळका पोलीस स्टेशनअंर्तगत येणार्या गावांना चोरट्यांनी टार्गेट करून अक्षरश: धुमाकूळ घातला होता. लाखमोलाच्या शेतमालासह मोटारसायकल व शेतीपयोगी साहित्य लंपास करून चोरट्यांनी नवीन पोलीस अधीक्षकांना जणू सलामीच दिली होती. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्व पोलीस अधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे चोरट्यांची टोळी अधून-मधून येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंबादास गांगुर्डे, मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, मंगरूळपीरचे ठाणेदार अनिलसिंग गौतम, आसेगावचे ठाणेदार सुनील अंबुलकर, जऊळका ठाणेदार किरण साळवे, अनसिंगचे ठाणेदार डी.एम. घुगे यांनी ताफ्यासह २८ जानेवारीच्या रात्री १२ वाजेपासून माळेगावात तळ ठोकला. पहाटे ३ वाजतादरम्यान आरोपीच्या घरावर छापा टाकून निंबाजी राघोजी जाधव (५५), गजानन भीमराव जाधव (२५), मारोती निंबाजी जाधव (२0), अर्जुना निंबाजी जाधव (६५), संतोष निंबाजी जाधव (२५) सर्व रा. माळेगाव व भूजंग दादाराव काळे (२६) रा. पार्डी टकमोर, पांडुरंग गुलाब तांगडे (२५) रा.इचोरी या आरोपींना जेरबंद केले. पोलीस खाक्या दाखविताच सर्व आरोपींनी चोरी केलेल्या मुद्देमालाची माहिती दिली. नऊ मोटारसायकली, सोयाबीन पोते, कंपाऊंड तार, बोलेरो पिक अप, ज्वारी, फ्रीज, आटा चक्की, ताडपत्री, पाण्याच्या टाक्या, हवा भरण्याची मोटर असा एकूण १४ लाख ८0 हजारांचा माल जप्त केला. आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८0 अन्वये गुन्हा दाखल केला.