वाशिम : कर्मचारी संघटनांची वज्रमूठ; न्यायोचित मागण्यांसाठी एकजूट!
By संतोष वानखडे | Updated: April 22, 2023 19:09 IST2023-04-22T19:09:21+5:302023-04-22T19:09:35+5:30
कर्मचारी संघटनांनी वज्रमूठ आवळत न्यायोचित मागण्यांसाठी एकजूट होण्यावर शिक्कामोर्तब केले.

वाशिम : कर्मचारी संघटनांची वज्रमूठ; न्यायोचित मागण्यांसाठी एकजूट!
वाशिम : कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित मागण्या निकाली काढण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची वाशिम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात बैठक पार पडली असून, कर्मचारी संघटनांनी वज्रमूठ आवळत न्यायोचित मागण्यांसाठी एकजूट होण्यावर शिक्कामोर्तब केले.
जून्या पेन्शनसह इतर मागण्यांसाठी १४ ते २० मार्चदरम्यान कर्मचारी संघटनांनी जिल्ह्यात बेमुदत संप यशस्वी केल्यानंतर पहिली समन्वय समितीची बैठक २१ एप्रिलला घेण्यात आली. सर्वप्रथम शहिद जवान अमोल गोरे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २० मार्च रोजी बेमुदत संप मागे का घेण्यात आला याचे स्पष्टीकरण सादर केले आणि त्यावर चर्चा घडवून आणली. १४ ते २० मार्चदरम्यानच्या संपाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचा नेमका काय फायदा झाला यावर विचारमंथन झाले.
सेवेत असताना एनपीएसधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला निवृत्ती वेतन यांसह १८ मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व संघटनांची वज्रमूठ निर्माण होण्यासाठी व सर्व संघटनांचे सलोख्याचे संबंध राहण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला. जिल्ह्यातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्यास त्याविरोधात दाद मागण्यासाठी समन्वय समिती सक्रिय राहिल, असा निर्धारही करण्यात आला. यावेळी विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.