दुभंगलेले तीन संसार लोकअदालतीत जुळले; लोकन्यायालयात ३ कोटींची तडजोड
By दिनेश पठाडे | Updated: September 9, 2023 20:25 IST2023-09-09T20:24:45+5:302023-09-09T20:25:22+5:30
१५१५ प्रकरणे निकाली

दुभंगलेले तीन संसार लोकअदालतीत जुळले; लोकन्यायालयात ३ कोटींची तडजोड
वाशिम : कौटुंबिक वादातून कायमचे वेगळे होण्याच्या मार्गावर असलेल्या तीन जोडप्यांचे संसार लोकअदालतीच्या निमित्ताने पुन्हा जुळले. पॅनलने यशस्वी तोडगा काढल्याने आपसी तडजोड झाली अन् पती-पत्नीने पुन्हा संसार फुलविण्याचा निर्णय घेतला. या जोडप्यांना कौटुंबिक न्यायालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आले तसेच उपस्थित न्यायाधीशांनी त्यांचा सन्मान केला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेलया निर्देशानुसार जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी जिल्हा, सर्व तालुका न्यायालायामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील पॅनलला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश आर.पी.पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी भेट दिली.
वाशिम जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रकारणाचा निपटारा करण्यात आला. एकाच दिवसात १५१३ प्रकरणांचा निपटारा होऊन ३ कोटी १९ लाख ८७ हजार ८१४ रुपयांची तडजोडी झाली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका वकील संघ, जिल्हा पोलिस दल, जिल्हा, तालुका विधी सेवा प्राधिकरणकडून प्रयत्न करण्यात आले.