‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले
By सुनील काकडे | Updated: September 24, 2022 17:34 IST2022-09-24T17:32:59+5:302022-09-24T17:34:32+5:30
सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे.

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले
वाशिम
सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. या सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणे सुरू केले, अशी घणाघाती टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, २४ सप्टेंबर रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेली भारत जोडा पदयात्रा वाशिम जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यानिमित्त प्रवासमार्गाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आले असता, त्यांनी वाशिमच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, विविध स्वरूपातील अडचणी आणि समस्यांना वाचा फोडून देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वधर्मीयांना सोबत घेऊन भारत जोडा पदयात्रा आरंभीली आहे. या यात्रेत पंजा नव्हे; तर तिरंगा खांद्यावर घेण्यात आला आहे. त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पटोले यांनी सांगितले.
काॅंग्रेसने जनतेचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात याच पक्षाची सत्ता होती. त्या काळात पक्षाने कधीही व्देषाचे राजकारण केले नाही. कुणाच्याही मागे इडी लावली नाही. बेरोजगारी कमी करणे, महागाई नियंत्रणात ठेवणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणे यासह देशहिताचे निर्णय पक्षाने सातत्याने घेतले. सत्तेत नसताना महागाईविरोधात सर्वाधिक मोर्चे काॅंग्रेसनेच काढले. भर पावसात पक्षाने ७५ किलोमिटर तिरंगा यात्रा काढली, असे पटोले म्हणाले.
पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी गुलदस्त्यात
महाराष्ट्रात जेव्हापासून ‘इडी’चे सरकार आले, तेव्हापासून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे सांगून २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पटोले म्हणाले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासाठी महाराष्ट्रातील नागपूरवरून बारूद गेल्याची शंका उपस्थित झाली होती, त्याची सीबीआय चाैकशी करण्याची ग्वाही सरकारने दिली होती; मात्र त्याचे नेमके काय झाले, असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला.
सरकार आंधळे, बहिरे आहे का?
सध्या महागाई नियंत्रणाबाहेर आहे. बेरोजगारीचा आलेख उंचावत आहे. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुरशीजन्य रोगाने सोयाबीनची अतोनात हानी झाली. असे असताना विद्यमान सरकार आंधळे, बहिऱ्याची भूमिका घेत आहे. वाशिम जिल्ह्यात येऊन गेलेले कृषिमंत्री झाडाला लागलेल्या १५० शेंगा दाखवत आहेत. ही जनतेची एकप्रकारे थट्टा असल्याची टिका पटोले यांनी केली.