अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:54+5:302021-08-22T04:43:54+5:30
पूर्वी काजू, बदाम, मणुका, आक्रोड, अंजीर आदी प्रकारचा सुकामेवा श्रीमंतांच्याच घरात दिसून यायचा; मात्र अलीकडील काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलली ...

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रूट्स महागले !
पूर्वी काजू, बदाम, मणुका, आक्रोड, अंजीर आदी प्रकारचा सुकामेवा श्रीमंतांच्याच घरात दिसून यायचा; मात्र अलीकडील काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलली असून अधिकांश मध्यमवर्गीयांच्या घरातील डब्यांमध्येही सुकामेवा राहायला लागला आहे. दरम्यान, सुक्या मेव्यातील अंजीर, बदाम, मणुके, काजू, पिस्ता, अक्रोड, शहाजीरे आदी अफगाणिस्तानमधून आयात होते; मात्र मागील काही दिवसांत त्याठिकाणी निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका भारतीय ड्रायफ्रूट बाजाराला बसला असून सुक्यामेव्यातील अनेक वस्तूंचा दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
.....................
मागणी कायम, साठवणूक मर्यादित
वाशिम शहरातील किराणा दुकानांमधून सुक्यामेव्याला चांगली मागणी आहे. पाटणी चाैकातील मुख्य बाजारात ठोक, किरकोळ विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या सुक्यामेव्याचे प्रमाण किती, याची नेमकी माहिती कळू शकली नाही. दरम्यान, दर वाढले असले तरी मागणी कायम आहे; मात्र व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये साठवणूक मर्यादित स्वरूपात केलेली आहे.
.................
दर कमी होणे आवश्यक
वाशिम शहरात नागरिकांकडून सुक्यामेव्याला मोठी मागणी आहे; मात्र गेल्या काही दिवसांत अनेक वस्तूंचे दर वाढल्याने ही बाब ग्राहकांना असह्य करणारी ठरत आहे. ६०० रुपये किलो असलेली बदाम ९०० रुपयांवर पोहोचली यामुळे अनेकजण दर विचारल्यानंतर खरेदीसाठी टाळाटाळ करीत आहेत.
- श्रीनिवास बत्तुलवार, ड्रायफ्रूट विक्रेते, वाशिम
...............
वाशिम शहरात विशेषत: बदाम, काजू, मणुक्यांना अधिक मागणी आहे; मात्र, दर वाढल्याने खरेदी आणि विक्री दोन्हीवर परिणाम झालेला आहे. यामुळे सर्वसामान्यांना परवडेल असा दर असायला हवे; तरच या क्षेत्रात उलाढाल वाढणार आहे. यामुळे वाढलेले दर कमी होणे आवश्यक आहे.
- नागेश्वर काळे, ड्रायफ्रूट विक्रेते, वाशिम
.............
भाव फलक...
ड्रायफ्रूट तणावापूर्वी तणावानंतर
बदाम ६०० ९००
अंजीर ९०० १२००
अक्रोड ८०० १०००
लिंबूसत्त्व १०० १६०