मंगरूळपीर (वाशिम) : स्वत:च्या आईनेच अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकल्याचा आधी गळा दाबून त्यास जीवे मारले व नंतर त्याचे प्रेत विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना शेलूबाजार येथे ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी मातेसह अन्य एकाविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विठोबा यादवराव माहुलकर (वय ४१ वर्षे, रा. ब्राम्हणवाडा, जि.अमरावती) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ३ ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी संगीता माहुलकर आणि साडू शरद मनिराम खुरसडे (रा. कारंजा) यांनी फियार्दीचा दहा महिन्याचा मुलगा शौर्य यास गळा दाबून जीवे मारले व त्याचे प्रेत शेलूबाजार येथील एका विहिरीत फेकून दिले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली व तत्काळ घटनास्थळ गाठून विहिरीतून प्रेत बाहेर काढले. याप्रकरणी आरोपी माता संगीता माहुलकर व शरद खुरसडे या दोघांवर भादंविचे कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल तांबे करीत आहेत.