दोघांची ‘तात्पुरती’ कार्यमुक्ती ; आशा वर्कर्स प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:41+5:302021-08-22T04:43:41+5:30
धनंजय कपाले वाशिम : जिल्हाभरातील आशा स्वयंसेविकांकडून छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाण घेवाण केल्याबाबत जिल्हा समूह संघटक अनिल ...

दोघांची ‘तात्पुरती’ कार्यमुक्ती ; आशा वर्कर्स प्रकरण
धनंजय कपाले
वाशिम : जिल्हाभरातील आशा स्वयंसेविकांकडून छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाण घेवाण केल्याबाबत जिल्हा समूह संघटक अनिल उंदरे व तालुका समूह संघटक राहुल धमेरीया यांना त्यांच्या पदावरून ‘तात्पुरते’ कार्यमुक्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रजिस्टरच्या देवाण घेवाण प्रकरणाची पुन्हा एक वेळा सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींना कायमस्वरूपी कार्यमुक्त करावयाचे किंवा नाही यावर निर्णय होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हाभरात शेकडोवर आशा स्वयंसेविका आहेत. या आशा स्वयंसेविकांकडून आंदोलन असो वा इतर कोणतेही कारण समोर करून काही लोक पैसे उकळण्याचा गोरखधंदा बऱ्याच वर्षांपासून करीत आहेत. यामधीलच एक भाग म्हणून रजिस्टरच्या नावाखाली १२०० ते १७०० रुपयापर्यंत वसुली केल्याचे वृत्त लोकमतने पुराव्यानिशी प्रकाशित केले. लोकमतच्या या दणक्याने प्रशासन चांगलेच हादरून गेले. अखेर प्रशासनाने लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा समूह संघटक उंदरे व तालुका समूह संघटक धमेरीया यांना तात्पुरते कार्यमुक्त केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ही त्रिसदस्यीय समिती जिल्हाभरातील आशा व गट प्रवर्तकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून रजिस्टरच्या नावाखाली रक्कम घेतली आहे का ? याची माहिती संकलित करणार आहेत. या चौकशीपूर्वी जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
................
आशांचे भविष्य त्यांच्याच हाती !
गेल्या अनेक वर्षांपासून आशा स्वयंसेविकांवर दडपण आणून त्यांच्याकडून रक्कम वसुलीचा गोरखधंदा काही लोक करीत आहेत. हे सर्वश्रुत आहे. विविध प्रकारे या वर्कर्सना ‘ब्लॅकमेलिंग’ केले जात आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या मानधनावर असल्यामुळे आशा वर्कर्स निमूटपणे मागितलेली रक्कम वरिष्ठांना देतात. ही सर्व सत्यता आशा स्वयंसेविकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीसमोर मांडली तर त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि भविष्यात या जाचापासून त्यांची कायमस्वरूपी मुक्तता होईल. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.